आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोचसाठी वेगळी लूट कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:10 AM2021-09-11T04:10:34+5:302021-09-11T04:10:34+5:30
(स्टार ११६१ डमी) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गॅसच्या किमती एकीकडे हजाराच्या घरात गेल्या असताना घरपोच डिलिव्हरी पुन्हा जास्त ...
(स्टार ११६१ डमी)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गॅसच्या किमती एकीकडे हजाराच्या घरात गेल्या असताना घरपोच डिलिव्हरी पुन्हा जास्त पैसे मोजावे लागतात. मात्र, हे डिलिव्हरी बॉय याची कुठलीही पावती संबंधित ग्राहकांना देत नाहीत. हे अतिरिक्त पैसे घेणे योग्य आहे का, असा सवाल ग्राहकांनी केला आहे.
पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात २०० च्यावर गॅस सिलिंडर वितरक आहेत. तर ग्राहकांची संख्या अंदाजे १५ ते २० लाखांपर्यंत आहे. दर महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्याच आता घरपोच डिलिव्हरीसाठी कर्मचारी कोणतीही पावती न देता कमीत कमी २० ते जास्तीत जास्त ४० रुपयांपर्यंत आकारणी करतातच. १५ ते २० लाख ग्राहकांकडून प्रत्येक सिलिंडर मागे २० ते ४० रूपये आकारणे म्हणजे ही लाखोंची लूट आहे. त्याशिवाय सिलिंडर देत नसल्याचे शहरातील काही गृहिणीने सांगितले.
------
पाँईटर्स
* सध्याचा गॅस सिलिंडर दर - ८८७.५० रुपये (१४ किलोसाठी)
* शहरातील एकूण ग्राहक - अंदाजे १५ ते २० लाख
----
* वर्षभरात २४० रुपयांची वाढ
डिसेंबर २०२० रोजी १४ किलोग्रॅम गॅस सिलिंडर टाकीचा दर ६४७ रुपये होता. तो आता सप्टेंबर २०२१ रोजी ८८७.५० रुपये इतका झाला आहे. म्हणजे मागील दहा महिन्यांत २४०.५० रुपयांनी गॅसचे दर वाढले आहे. मागील तीन महिन्यांपासून तर सातत्याने सिलिंडरच्या भावात वाढ होत आहे. जुलै महिन्यात ८३७ रुपये, ऑगस्टमध्ये ८६२ रुपये तर सप्टेंबर महिन्यात ८८७ रुपये एका सिलिंडरचे दर झाले आहेत. म्हणजे मागील तीन महिन्यांत ७५ रुपयांनी गॅस सिलिंडर महागला आहे.
---
* डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
मागील तीन महिन्यांत गॅसचे दर ७५ रुपयांनी वाढला आहे. सर्वसामान्य माणसांची ही लूट सुरू आहे. शासनाला त्याचे काही गांभीर्य राहिलेले दिसत नाही. त्यातच आता गॅस वितरक कोणतीही पावती न देता २० ते ४० रूपयांची आकारणी करत आहेत. त्यामुळे शहरातील फ्लॅटमध्येसुद्धा आता चुली पेटविण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
- मैनाबाई कदम, गृहिणी
----
* वितरक काय म्हणतात?
गॅस वितरकांमार्फत आम्ही ग्राहकांना घरपोच सेवा देत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये लिफ्टची सविधा नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉय किंवा कर्मचाऱ्याला चार-पाच मजले डोक्यावर घेऊन जाऊन पोहोच करावा लागतो. त्यामुळे प्रचंड शारीरिक मेहनत या डिलिव्हरी बॉय किंवा कर्मचाऱ्याला करावे लागत असल्याने त्याबदल्यात ते २० रुपये घेतात, असे पुण्यातील काही गॅस वितरकांनी सांगितले.