नजर काहीशी अंधूक; तरुणांना लाजवेल असा उत्साह, तब्बल ९८ वर्षांच्या आजोबांची ५६ वी वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 10:07 AM2022-06-24T10:07:26+5:302022-06-24T10:08:24+5:30
जिद्द, आत्मविश्वास अन् माऊलीला भेटण्याची आस काय असते, याचे उत्तम उदाहरण
पुणे : नजर काहीशी अंधूक झाली आहे, तरीही आज देखील तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने ९८ वर्षांचे आजोबा पंढरीच्या वारीला निघाले आहेत. कदाचित विश्वास बसणार नाही; पण यंदाची त्यांची ही ५६ वी वारी आहे. मागील दोन वर्षांचा खंड पडला, नाहीतर त्यांची वारी साठीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली असती.
जिद्द, आत्मविश्वास अन् माऊलीला भेटण्याची आस काय असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मण शेरकर. तब्बल ४५० किमीचा पल्ला गाठत ते पुण्यात पोहोचले आहेत. आजोबांच्या ऊर्जेने इतर वारकऱ्यांना वारीत पायी चालण्याची प्रेरणा मिळत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत दिंडी क्रमांक १ मध्ये लक्ष्मण शेरकर आजोबा सहभागी झाले आहेत. वय विसरून ते पालखीत चालतात. प्रत्येकाला प्रेरित करतात. त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास खूप प्रोत्साहित करणारा असल्याचे त्यांच्यासोबत दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी सांगितले.
याबाबत आजाेबा लक्ष्मण शेरकर सांगतात की, कधी जन्मलो किंवा आपल्या जन्माची तारीख काय आहे, हे मला माहिती नाही. आईने जी जन्माची तारीख सांगितली त्यानुसार वय मोजत गेलो आणि आता ९८ वर्षांचा झालो आहे. मी मूळचा बीड जिल्ह्यातला माजलगाव तालुक्यातील पाथरूड गावचा आहे. माझ्या कुटुंबात कोणीही नाही. एकटे का होईना माऊलीच्या भेटीची आस मला पालखीत घेऊन येते.
मला वारीतून आनंद, समाधान मिळते
''काेराेना संकटामुळे मागील दोन वर्षे पायी पालखी झाली. त्यामुळे खूप रुखरुख होती. यंदा सोहळा होत असल्याने खूप आनंद हाेत आहे. वय झाले असले, तरी अंगात ताकद आणि हिंमत आहे तोपर्यंत वारीत पायी चालणारच. मला वारीतून आनंद, समाधान मिळते. त्यामुळेच वारीत दरवर्षी मी न चुकता येतो असे लक्ष्मण शेरकर यांनी सांगितले.''