मास्क, सॅनिटायझर वापरताना त्वचेचीही घ्या काळजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:19+5:302021-07-26T04:09:19+5:30
पुणे : मास्कचा वापर वाढल्याने त्वचेसंदर्भातील आजार समोर येत आहेत. मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराने त्वचेचा कोरडी पडणे, खाज सुटणे, ...
पुणे : मास्कचा वापर वाढल्याने त्वचेसंदर्भातील आजार समोर येत आहेत. मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराने त्वचेचा कोरडी पडणे, खाज सुटणे, लाल चट्टे उठणे, पुरळ उठणे अशा तक्रारी उदभवत आहेत. चांगल्या दर्जाचा मास्क वापरावा, त्वचेला रात्री झोपताना मॉयश्चरायझर लावावे, कोरडेपणा टाळण्यासाठी द्रव रुपातील सॅनिटायझरऐवजी जेल वापरावे किंवा साबणचा वापर करावा, असा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांकडून दिला जात आहे.
कोरोना काळात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य झाला आहे. कोरोना प्रतिबंधक वर्तनाचा भाग म्हणून सध्या तरी मास्कच्या वापराला पर्याय नाही. तसेच, घराबाहेर असताना प्रत्येक वेळी साबण वापरणे शक्य नसते. सॅनिटायझरमधील रासायनिक घटकांचा त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. काहींना विशिष्ट घटकांची अॅलर्जीही उठण्याची शक्यता असते. अशा वेळी, द्रवरुपी सॅनिटायझरऐवजी जेलरुपी सॅनिटायझर वापरल्याने त्वचा कोरडे पडण्याचे प्रमाण कमी होते.
मास्कमुळे त्वचेचे संरक्षण होत असले तरी मास्क दोन्ही बाजूंनी पूर्ण बंद नसतात. मास्कवर धूळ, धुलिकण, माती बसते. मास्कच्या दोन्ही बाजूंनी धूळ आत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर लाल चट्टे उठणे, डाग, पुरळ उठणे असा त्रास उदभवतो. त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मॉयश्चरायझरचा नियमितपणे वापर करावा. यामुळे त्वचेतून नैसर्गिक स्वरुपात होणा-या तेलाचा स्त्राव नियंत्रणात राहण्यास मदत होते.
--------------------------
बरेचदा मास्कचे इलॅस्टिक त्वचेवर घासले गेल्याने त्रास होतो. अशा वेळी मास्कचे कापड, इलॅस्टिकचा दर्जा याबाबत खात्री करुन घ्यावी. मास्कमुळे त्वचेला त्रास झाल्यास बॅरियर क्रीम वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, प्रत्येकाच्या त्वचेचा पोत, प्रकार वेगवेगळा असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने कोणतेही उपचार करु नयेत.
- डॉ. प्रदीप महाजन, त्वचारोगतज्ज्ञ
-----------------------------
मास्कमुळे त्वचेवर पुरळ उठण्याची शक्यता असते. मास्कचा कोपरा घासला गेल्याने डागही पडू शकतात. अशा वेळी गोळया किंवा मलम वापरुन त्रास कमी करता येऊ शकतो. सॅनिटायझरमुळे हाताच्या त्वचेची साले निघण्याची शक्यता असते. त्यामुळे साबण वापरण्यावर जास्त भर द्यावा.
- डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, त्वचारोगतज्ज्ञ