पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पर्यायी रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:27 AM2019-02-25T00:27:00+5:302019-02-25T00:27:03+5:30
खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत : तीन वर्षांत काम पूर्ण करणार
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. येत्या तीन वर्षात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे पुणे-मुंबई अंतर आणखी कमी होणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी होणारा खर्च येत्या २०४५ पर्यंत टोलच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे.
द्रुतगती महामार्गावर काही ठिकाणी काही ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करून वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडून ‘मिसिंग लिंक’ नावाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागची परवानगी आवश्यक होती. केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाकडून या रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली असल्याने प्रकल्पातील प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे.
हा प्रकल्प तब्बल ४ हजार ८०० कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पामुळे बोरघाटातील ६ कि. मी. वळणाच्या मार्गाला पर्यायी मार्ग उपब्लध होणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांच्या सुमारे २५ मिनिटांची बचत होणार आहे.तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रस्ता आठपदरी
‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक केबल स्टे ब्रिज, खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता आणि दोन बोगदे काढले जाणार आहेत. केबल स्टे ब्रिजची लांबी ५ मीटर आणि उंची १३५ मीटर असेल.पहिला बोगदा १.६ कि. मी. आणि दुसरा १.१२ कि. मी. लांबीचा असणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या प्रकल्पाच्या जागेपैकी ९० टक्के जागा वन विभागाची आहे, नवयुग इंजिनिअरिंग कंपनीकडून हे काम होणार आहे. येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.