राजगुरूनगर शहरातील वाहतूककोंडीला होणार पर्यायी मार्ग!
By admin | Published: March 10, 2017 04:41 AM2017-03-10T04:41:32+5:302017-03-10T04:41:32+5:30
अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे.
राजगुरुनगर : अखेर केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणाऱ्या पुलाचे काम सुरू झाले असून, या पुलामुळे राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निर्माण होणार आहे. परंतु त्याचवेळी पुणे-नाशिक महामार्गाच्या बाह्यवळणाचे काम स्थानिक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईवर अद्याप तोडगा न निघाल्याने ठप्प आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सध्यातरी अधांतरीच राहणार आहे.
राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालक व प्रवासी नेहमीच त्रस्त असतात. सुटीच्या दिवशी तसेच लग्नसराईच्या काळात तर कमीत कमी दोन ते तीन तास या भागात अडकून पडावे लागते. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना दोन-दोन किलोमीटर रांगा लागतात. अनेक व्हीआयपी लोकही या वाहतूककोंडीमध्ये अडकून पडतात. रुग्णवाहिकाही या कोंडीमध्ये अडकतात.
या वाहतूककोंडीला केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणारा पूल आणि खेड ते सिन्नरदरम्यान सुरू असलेले पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणांतर्गत राजगुरुनगरच्या पूर्वेकडून होणारे बाह्यवळण हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी केदारेश्वर येथे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केंद्रिय रस्ते निधीतून पूल मंजूर केला असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर पुण्याहून राजगुरुनगर शहरामध्ये येणारी वाहने व पश्चिमेकडे वाडा परिसरात जाणारी वाहने बसस्थानकाकडे न जाता बाहेरुनच जातील, त्यामुळे वाहतूककोंडीला खूपच फरक पडणार आहे. मात्र, त्याचवेळी भूसंपादन होऊनही बाह्यवळणाच्या कामाला मात्र अद्यापही सुरुवात झालेली नाही.
पूर्वेकडून जाणाऱ्या या बाह्यवळणाला चांडोली, होलेवाडी, राक्षेवाडी, ढोरे-भांबूरवाडी, राजगुरुनगर व सांडभोरवाडी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शासनाने अध्यादेश काढून या जमिनींचे संपादन केले आहे. तरीही नुकसान भरपाई शासकीय दरानुसार न मिळता बाजारभावानुसार मोबदला मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. आळेफाटा ते सिन्नर चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे आणि टोलवसुलीही सुरू केली आहे. (वार्ताहर)
पोलीस स्थानक ते गढई मैदान
पोलीस स्थानक ते गढई मैदान रस्त्याच्या सुशोभीकरणादरम्यान राजगुरुनगर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेला आणखी एक पर्याय पोलीस स्थानक ते गढई मैदान या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरणाचे काम नगर परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याची व ओढ्यावरील पुलाची खूपच दुर्दशा झाली होती.
या रस्त्याने जाताना अक्षरश: नाक मुठीत धरून जावे लागते.
हुतात्मा राजगुरुवाड्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर केला
जातो. या रस्त्याच्या कामासाठी ७९ लाख रुपयांची तरतूद केली असून, त्यामध्ये चौदाव्या वित्त आयोगातून ४० लाख ७६ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्हीही बाजूंनी भिंत बांधून हरित पट्टा, लॅण्डस्केपिंग व सुशोभीकरण केले जाणार आहे. तर रस्त्याचे काम स्थानिक निधीतून केले जाणार आहे.
त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांना तसेच हुतात्मा राजगुरुवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना या रस्त्याचा फायदा होणार असल्याचे नगराध्यक्ष बापू थिगळे व मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांनी सांगितले.