उपचार सुरु असतानाही बंडातात्यांचा संकल्प पूर्ण; निवृत्तीनाथांच्या चरणी ८ तोळे सोने अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:54 PM2023-01-17T15:54:07+5:302023-01-17T15:54:59+5:30
बंडातात्या कराडकर यांना मागील आठवड्यात पक्षाघाताचा त्रास झाल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु
पुणे : हभप बंडातात्या कराडकर यांना मागील आठवड्यात पक्षाघाताचा त्रास झाला होता. त्यांच्यावर प्राथमिक उपचार फलटण येथील खाजगी रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी कराडकर यांना पुणे येथे हलवण्यात्त आले. सध्या त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात असतानाही त्यांनी मकरसंक्रातीला त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ यांच्या चरणाशी त्यांनी सुमारे पाच लाख रूपयांचे किमतीचे आठ तोळे सोने अर्पण केले आहे. त्यांचे भक्त सुनिल राऊत यांच्या हस्ते पंढरपूरच्या बापूसाहेब महाराज देहूकर यांच्याकडे हे सोने निव़त्तीनाथांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
बंडातात्या कराडकर यांनी त्र्यंबकेश्वर मधील निवृत्तीनाथ महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला सोने अर्पण करणार असा संकल्प केला होता. भक्त सुनिल राऊत यांच्याशी याबाबतीत चर्चा करत, त्यांनी आठ तोळे सोन्याचे दागिने तयार करण्यास सांगितले. याप्रमाणे त्यांनी सोन्याचे दागिने तयार करुन घेतले. आणि मकरसंक्रातीच्या शुभमुहूर्तावर ते निवृत्तीनाथाच्या चरणी अर्पण केले.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत, प्रकृतीची विचारपूस केली आहे. फलटण येथे प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या बाहेर त्यांचे अनुयायी आणि राज्यातील जेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, रुग्णालयाचे कडक नियम पाळून कुणीही आत प्रवेश करत नाही. प्रत्येक जण आपआपल्या परीने परमेश्वराकडे आपल्या परमभक्तास पांडुरंगाने लवकर बरे करावे. अशी प्रार्थना करीत आहेत.