ढाब्यांवर अजूनही खुलेआम दारूविक्री

By admin | Published: July 21, 2015 03:30 AM2015-07-21T03:30:40+5:302015-07-21T03:30:40+5:30

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले असले, तरी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील ढाब्यांवर सर्रास दारूविक्री सुरू आहे.

Always open the liquor on the dhabas | ढाब्यांवर अजूनही खुलेआम दारूविक्री

ढाब्यांवर अजूनही खुलेआम दारूविक्री

Next

पुणे : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले असले, तरी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील ढाब्यांवर सर्रास दारूविक्री सुरू आहे. या ढाब्यांवर तळीरामांना हवी तेव्हा दारू मिळत आहे. या ढाब्यांवर कारवाई करण्यास उत्पादन शुल्क विभाग उदासीन आहे.
पोलिसांनी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र, असे असतानाही सर्रास विनापरवाना दारूविक्री होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवरील ढाब्यांवर प्रामुख्याने दारूविक्री होत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-सोलापूर महामार्ग, पुणे-नगर महामार्ग तसेच पुणे-सातारा महार्गावरील अनेक ढाब्यांवर परवानगी नसतानाही दारूविक्री होत आहे. पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क खात्यावरही, बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री होऊ नये, त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. मात्र, या उत्पादकांवर तसेच विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत हा विभाग उदासीन आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाच्या जवळील सर्वच ढाब्यांवर बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याचे चित्र आहे. यवत, कासुर्डी फाटा, भांडगाव, वाखारी, चौफुला, केडगाव, बोरीपार्धी, वरवंड, पाटस व महामार्गाच्या बाजूला असलेल्या ढाब्यांवर बेकायदेशीर दारूविक्रीने जोर धरला आहे. दारूविक्रीसाठी शासकीय परवाना आवश्यक असतो. मात्र, ढाब्यांवर विनापरवाना दारूविक्री होत आहे. या ढाब्यांना वेळेचे बंधन नसते. २४ तासांत केव्हाही तळीराम या ठिकाणावरून दारू मिळवतात. यावर कारवाई झाल्यास ती किरकोळ स्वरूपाची असते. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी ढाब्यांवरही हीच परिस्थिती आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते सारोळा (भोर) या राष्ट्रीय महामार्गालगत ढाब्यांवर सर्रास दारूविक्री होते. काही बोटांवर मोजता येणारे ढाबे जेवणासाठी अधिकृत आहेत. बाकी हॉटेल-ढाब्यांवर सर्रास दारू मिळते. बऱ्याच ढाब्यांवर ‘खाणे कम दारू जाम’ असे चित्र पाहण्यास मिळत आहे. तर, कापूरव्होळ व सारोळ्यातील हॉटेल व परिसरातील काही ढाब्यांवर दारूविक्री होत नाही; परंतु दररोजच्या ग्राहकांना जपण्यासाठी वाईन शॉपमधून दारू उपलब्ध करून तळीरामांचा मार्ग सुकर केलेला दिसून येतो. अनधिकृत ढाबेवाल्यांचे हप्ते पोलिसांना व उत्पादन शुल्क विभागात वेळच्या वेळी पोहोचले जातात. त्यामुळे ‘हप्ता आहे, कारवाई नाही’ असे चित्र या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. अनधिकृत ढाब्यांवर हातभट्टी ते इंग्लिश दारू मिळत आहे. या ढाब्यांवर एक वेळ जेवायला मिळणार नाही; पण दारू प्यायला मिळेल आणि हेच खरे उत्पन्नाचे, नफ्याचे साधन म्हणून काही ढाबेचालकांनी ही पद्धत सुरू केली आहे. पोलिसांत तक्रार दिली, तर त्याचीच उलटतपासणी करून
‘दाखव कुठे आहे अनधिकृतपणा?’ असे उलट चित्र या परिसरामध्ये पाहण्यास मिळते.
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण-राजगुरुनगर-पेठ या भागामध्ये हॉटेल आणि ढाबे यांची संख्या जास्त आहे. याठिकाणी बाहेरून मद्य घेऊन येऊन मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे; परंतु उत्पादन शुल्क खाते अथवा पोलीस खाते या गोष्टीला आवर घालण्यास असमर्थ ठरले आहे. तरीही राजगुरुनगर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत चार-पाच ठिकाणी छापे घातले आहेत. पुणे-नाशिक महामार्गाच्या या भागात लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने आणि महामार्गावरही प्रवासीसंख्या वेगाने वाढत असल्याने हॉटेल व ढाबे वाढत आहेत. या भागात दर दोन-चार महिन्यांत एखादा ढाबा सुरूझालेला पाहायला मिळतो. त्यामधून सर्रास मद्यपान करणारेही दिसतात. बाहेरून मद्य विकत आणायचे आणि ढाब्यात किंवा हॉटेलात बसून मद्यपान करायचे, हे प्रकार रोजच पाहायला मिळतात. ग्राहक तुटू नये म्हणून हॉटेलमालकही या प्रकाराला मूकसंमती देतात. फक्त 'येथे मद्यपानास बंदी’ आहे' एवढा बोर्ड मात्र लावलेला असतो.
या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव म्हणाले, की २०१४ या वर्षात दौंड विभागातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती एमआयडीसी या परिसरात बेकायदेशीर दारूविक्रीचे २९२ गुन्हे नोंदून २०५ आरोपींना पकडलेले आहे. तर, २७ आरोपी फरार आहेत. १० हजार ८६९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. ढाब्यांवर ९१५ लिटर देशी दारू, तर ४११ लिटर विदेशी दारू, २७६ लिटर बिअर व २२५ लिटर बनावट विदेशी दारू त्याचप्रमाणे एकूण सर्व बेकायदेशीर दारूविक्रीचे १ लाख ७८ हजार ९१० लिटर रसायन पकडून त्याअंतर्गत ७५ वाहने जप्त केली आहेत. एकूण सर्वमिळून ८८ लाख ३१ हजार ५४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत जवळपास ८६ धाबे आहेत. यापैकी ७ ते ८ धाब्यांकडे अधिकृत दारूविक्रीचे परवाने आहेत. जवळपास ३८पेक्षा जास्त धाब्यांवर बेकायदेशीररीत्या दारूविक्री केली जात आहे. या धाब्यांवर देशी तसेच विदेशी बँ्रडचे मद्य विकले जात आहे. अनेक ठिकाणी तर तळीराम स्वत:सोबत मद्य आणून या ढाब्यांवर पितात. परवानगी नसतानाही ढाबामालक त्यांना दारू पिण्यास परवानगी देतात.
बनाबट दारू, बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांकडे विदेशी व देशी ब्रँडेड दारू उपलब्ध असते. मात्र, ही दारू बनावट असल्याचे अनेकांकडून सांगितले जाते. बनावट दारू ब्रँडेड बाटल्यांमध्ये भरून लाखो रुपयांची कमाई करणारे रॅकेटदेखील कार्यरत असल्याची दबक्या आवजातील चर्चा आहे. कमी किमतीत विदेशी दारू विकत घेऊन ढाब्यांवर विक्री केल्याचेदेखील बोलले जाते.

महामार्गाबरोबरच आता बहुतांश सर्वच गावांमध्ये ढाब्यांवर बेकायदा दारूविक्री सुरू झाली आहे. व्हेज-नॉन व्हेज ढाबे सुरू करून तेथे अशी दारूविक्री होते. दारू लपवून ठेवण्यासाठी ढाब्याच्या आजूबाजूच्या शेतातील खोल्यांचादेखील वापर केला जातो.

Web Title: Always open the liquor on the dhabas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.