संजय राऊतांना बहुतेक 'अल्झायमर' झालाय! भाजपच्या चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 10:01 PM2021-09-06T22:01:19+5:302021-09-06T22:02:47+5:30
'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे असा इशारा शिवसेनेला दिला आहे.
पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो असं वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहे. दोन्ही बाजूने शाब्दिक चकमकी घडत असल्याचे दिसत आहे. आता या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली त्यांनी थेट संजय राऊत यांना बहुतेक 'अल्झायमर' झाल्याचं दिसतंय अशी खरमरीत टीका केली आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतानाच खोटं बोल पण रेटून बोल असं म्हणत सकाळी एक बोलायचं दुपारी एक. सायंकाळी त्यांना हेच लक्षात राहत नाही की दुपारी आपण काय बोललो. त्यांना बहुतेक अल्झायमर सुरु झाल्याचं दिसतंय अशा शब्दात टोला लगावला.
आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळाच काढतो, असे राऊत क्लिअर कट म्हणाले आहे. पण पोलीस त्यांच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे ते काय करतील माहिती नाही. आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है,
'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है'बाबत विचारलं असता, पाटील म्हणाले, 'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार असं आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे.
तुम्ही पेढे कसं वाटता, लाज नाही वाटत तुम्हाला ? संजय राऊत
बेळगावला महाराष्ट्रात आणण्यासाठी शेकडो लोकांनी प्राण गमावले. बाळासाहेब तुरुंगात गेले होते. अन् याच बेळगावात मराठी माणूस हरल्यावर तुम्ही पेढे वाटता. लाज नाही वाटत तुम्हाला. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.