...फिरुनी नवी जन्मेन मी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:25 AM2019-03-08T01:25:15+5:302019-03-08T01:25:32+5:30

घर आणि नोकरी सांभाळून स्वत:ला सिद्ध करताना तिची अनेकदा घुसमट, दमछाक होते. मानसिक आणि शारीरिक ताणतणावांना सामोरे जाण्याची कसरतही नेहमीचीच!

... am new born baby! | ...फिरुनी नवी जन्मेन मी!

...फिरुनी नवी जन्मेन मी!

googlenewsNext

पुणे : घर आणि नोकरी सांभाळून स्वत:ला सिद्ध करताना तिची अनेकदा घुसमट, दमछाक होते. मानसिक आणि शारीरिक ताणतणावांना सामोरे जाण्याची कसरतही नेहमीचीच! तरीही, नोकरीवरून परतताना चेहरा आनंदी ठेवूनच घरात प्रवेश करावा लागतो. हे सगळे ती करते ते कशासाठी? करिअर, आर्थिक स्थैर्य की स्वानंद? तारेवरची कसरत करायला लावणारी ही रोजची लढाई लढूनही तिला पुढचा जन्म स्त्री म्हणूनच हवाय, हेच या महिला दिनाचे फलित!
>शिक्षिकेची नोकरी असल्याने सकाळी ७.१५ वाजता घर सोडावे लागते. जवळपास आठ तासांची ड्युटी होते. शाळेतून आल्यावर फारशी विश्रांती मिळत नाही. मुलाला खायला करून त्याला क्लासला सोडणे, मग आल्यावर पुन्हा स्वयंपाक आणि रात्री सकाळच्या डब्याची तयारी या सर्वांमध्ये दिवस कसा जातो ते कळतच नाही. सर्वांत जास्त जबाबदारीचे ओझे वाटते ते ‘स्वयंपाकाचे’. कारण डोक्यात सारखे आज कोणती भाजी करायची? खायला काय करायचे? याचेच विचार असतात. पण शाळेचे काम अधिक असेल तर इतर कामांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, अशा वेळी नवऱ्याची खूप मोलाची साथ मिळते. नोकरी ही सुरुवातीला करिअर म्हणून स्वीकारली असली, तरी ती आजच्या काळाची गरज बनली आहे. मुळातच नोकरीमध्येही मन गुंतवून घेतल्याने डोक्याला सतत चालना मिळत राहते. नोकरी आणि घर अशा जबाबदाऱ्या सांभाळताना कमालीची ओढाताण होते; पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे सर्व शक्य होते. मित्रमैत्रिणींना भेटणे, चित्रपट पाहणे, हॉटेलिंग याला आवर्जून वेळ काढते. त्यातून रिफ्रेश झाल्यासारखे होते. इतके कष्ट सोसूनही पुढचा जन्म बाईचाच मिळावा, असे वाटते. - गौरी शेठ, शिक्षिका

 


>मी एक महिला पोलीस अधिकारी असल्याचा मला अभिमान आहेच; पण मी महिला आहे, याचाही अभिमान आहे. पोलीस खात्यात नोकरी करण्याचा निर्णय माझाच आहे. पोलीस अधिकारी असल्यामुळे कामाचा ताण असतोच. त्यातूनही वेळ काढून घरी वेळ द्यावा लागतो. मला दोन मुले आहेत. कितीही काम असले तरी मी मुलांना वेळ देते. एकदा आॅफिसला गेल्यावर घरी येण्याची वेळ निश्चित नसते. आॅफिसला असल्यावर पूर्ण काम आॅफिसचे करायचे. घरी आल्यावर परिवाराला मी वेळ देते. माझा नवरा आयटी क्षेत्रात नोकरीला आहे. नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळेच पोलीस अधिकारी म्हणून सक्षमपणे नोकरी करत आहे. स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु, सकाळी फिरायला जाणे, योगा करणे गरजेचे असते. महिला ही नेहमीच सक्षम असते. ती आर्थिक सामाजिक दृष्ट्यादेखील सक्षम झाली पाहिजे. महिला दिन साजरा होतो याचा आनंद आहेच; परंतु महिलांना योग्य वागणूक मिळणे गरजेचे आहे. महिलेचे निर्णय हे नेहमीच अचूक असतात. येणारा काळ हा महिलांचाच आहे. महिलांनी नेतृत्व करण्याची गरज आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. मला पुढचा जन्म महिलेचाच हवा आहे.
- ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक
>‘पत्रकारिता’ ही माझी पॅशन आहे. आर्थिक गरज म्हणून हे क्षेत्र स्वीकारलेले नाही. मी घरातही बसू शकले असते; पण हे क्षेत्र मी स्वत: करिअर म्हणून निवडले आहे. वृत्तपत्र, आकाशवाणी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम केले. कधीकधी बारा-बारा तास किंवा निवडणुकांचे वार्तांकन करण्यासाठी महाराष्ट्राबाहेरही १५ दिवस राहिले. दोनदा मुलीच्या वाढदिवसालाही उपस्थित राहू शकले नाही. कधी तरी अचानक हातातले काम टाकून जावे लागले. हे सर्व करताना अनेकदा मनातून दोषी वाटले; पण कुटुंबाने मोलाची साथ दिली. सासू-सासरे, नवऱ्याचा पाठिंबा होता. नवºयाला उत्तम स्वयंपाक येत असल्याने कितीतरी वेळेला कामावरून उशिरा परतल्यानंतर त्याच्या हातून गरम जेवण मिळाले आहे. कामामुळे अनेकदा सणवार मनासारखे साजरे करता येत नाहीत. पाहुणे येणार असतील, की आदल्या रात्रीपासून तयारी करावी लागते. स्वत:हून व्यायामासाठी वेळही मिळत नाही. एवढे सगळे असूनही पुन्हा स्त्रीचाच जन्म मिळावा, असे वाटते. कारण स्त्री असल्यामुळेच आई होण्याचे भाग्य मला मिळाले.
- प्रतिभा चंद्रन, वरिष्ठ पत्रकार
>सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे करते. त्यानंतर कामाला जाते. कुटुंबीयांचा खूप मोठा आधार असल्याने कामात अडथळा निर्माण होत नाही. घर आणि नोकरीमध्ये स्वत:ला मात्र वेळ देता येत नाही. तसेच, आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. कुटुंबाला एक आधार मिळावा, यासाठी मी कंडक्टरची नोकरी करण्याचे ठरवले. आता समाजात पुरुषांप्रमाणे महिलासुद्धा नोकरी-व्यवसायात पुढे जात आहेत. एक महिला म्हणून जन्माला आले, याचे मला दु:ख नसून अभिमान आहे. कारण महिलेमध्ये सहनशक्ती, इच्छाशक्ती असते.
- वैशाली गांधले, कंडक्टर
>पेट्रोल पंपावरील नोकरी असल्याने दहा-बारा तास घराबाहेर राहावे लागते. मी अविवाहित असले, तरी घरची, आई-वडिलांची जबाबदारी माझ्यावरच आहे. घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे. त्यामुळे नोकरी करणे अपरिहार्य आहे. अनेकदा दोन्ही जबाबदाºया सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. माझे शिक्षण बारावीपर्यंत झाले, कमावणारे कोणीच नसल्याने पेट्रोल पंपावरील नोकरी स्वीकारली. गेल्या सात-आठ वर्षांपासून हे काम करते आहे. सकाळी ५.३० वाजता उठून घरचे आवरून बाहेर पडते. घरी जायला रात्रीचे आठ वाजतात. एवढ्या धावपळीत आरोग्यासाठी वेगळा वेळ देता येत नाही. स्त्री अधिक सक्षम, संवेदनशील आणि खंबीर असते. त्यामुळे पुढच्या जन्मी स्त्रीच होणे पसंत करेन.
- स्मिता शिंदे, पेट्रोल पंप कर्मचारी

 

Web Title: ... am new born baby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.