पुरंदरच्या शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षकांची आंबेगाव टूर
By admin | Published: April 9, 2015 05:09 AM2015-04-09T05:09:23+5:302015-04-09T05:09:23+5:30
पुरंदर तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची आज आंबेगाव तालुक्यात शाळांचे विविध उपक्रम पाहाण्यासाठी टूर गेली आहे.
बाळासाहेब काळे, पुरंदर
पुरंदर तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांची आज आंबेगाव तालुक्यात शाळांचे विविध उपक्रम पाहाण्यासाठी टूर गेली आहे. मात्र, टूरमध्ये सहभागी काही शिक्षकांच्या शाळा मात्र बंद होत्या. कोणत्याही प्रकारची माहिती न देता अशा प्रकारचा दौरा म्हणजे गटशिक्षणाधिकाऱ्यांची मनमानीच म्हणावी लागेल, असे पुरंदर पंचायत समितीच्या सभापती गौरी कुंजीर यांनी म्हटले आहे.
आज दि. ८ रोजी पहाटे चार वाजता पाच वाहनांतून पुरंदर तालुक्यातील सुमारे ४० शिक्षक, ७ केंद्रप्रमुख, १ विस्तार अधिकारी आंबेगाव तालुक्यात शाळांचा अभ्यास करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी रवाना झाले. यातील काही शिक्षकांच्या शाळा वाऱ्यावर सोडून देण्यात आल्या होत्या. एकीकडे दुसऱ्या तालुक्यात जाऊन शाळांचा अभ्यास करायचा आणि दुसरीकडे आपण ज्या शाळेत ज्ञानदान करतो, त्या शाळा वाऱ्यावर सोडून द्यायच्या. शैक्षणिक अभ्यास दौरा हाच का, असा प्रश्न पुरंदर तालुक्यातील शिक्षण व राजकीय क्षेत्रातून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, या अभ्यास दौऱ्याला कोणाचीही परवानगी नसल्याने हा दौरा एक चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, साकुर्डे येथील दोन शिक्षकी शाळेतील मुख्याध्यापक या दौऱ्यात सहभागी झालेले होते. तर दुसऱ्या सहशिक्षिका शाळेवर गेल्याच नव्हत्या. त्या शाळेत इयत्ता ४ थीपर्यंतचे वर्ग एक स्वयंसेविका सांभाळत होत्या. याबाबत साकुर्डे येथील ग्रामस्थांनी दोन्ही शिक्षक शाळेवर का नाहीत? याबाबत मुख्याध्यापकांशी भ्रमणध्वनीवरून चौकशी केली असता, आपण आंबेगाव येथे अभ्यास दौऱ्यासाठी आलो आहोत, तर सहशिक्षिका आजारी असल्याचे सांगितले. केंद्रप्रमुखांकडे चौकशी केली असता, मला याबाबत या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, हे दोघेही एकाच वाहनाने दौऱ्यासाठी एकत्रच होते.
पुरंदरच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडेही याबाबत संपर्क साधला असता, त्यांनीही आपणाकडे याबाबत कसलीच अधिकृत विचारणा अथवा परवानगी घेतलेली नसल्याचे सांगितले. या अनधिकृत दौऱ्याबाबत आपण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पुरंदरच्या गट शिक्षणाधिकारी ज्योती परिहार मात्र आपण वरिष्ठांची परवानगी घेतल्याचे सांगून दौऱ्याचे समर्थन करीत आहेत.