अमर साबळे यांनी गॅस अनुदान केले परत
By admin | Published: May 7, 2015 05:00 AM2015-05-07T05:00:15+5:302015-05-07T05:43:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी घरघुती गॅस सिलिंडरवरील अनुदान परत केले आहे.
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी घरघुती गॅस सिलिंडरवरील अनुदान परत केले आहे. त्यांनी इंडियन आॅईल कंपनीचे वरिष्ठ विभाग व्यवस्थापक कुलविंदर सिंग यांच्याकडे अनुदान नको असल्याचा अर्ज दिला आहे.
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान घेऊ नये. त्या अनुदानातून वाचणारी रक्कम ज्यांच्या घरी चुली आहेत, त्या चुली निर्मूलनासाठी वापरण्यात येणार आहे. चुलींच्या धुरामुळे माता-भगिनींच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, तसेच धुरामुळे होणारे हवेतील प्रदूषण रोखता येईल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अमर साबळे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडियन आॅईलच्या सर्व गॅस वितरकांनी घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान नको असल्याचे अर्ज भरून दिले आहेत. त्याचा शुभारंभ वाकड येथील एका एजन्सीमध्ये साबळे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी इंडियन आॅईलचे पुणे विभागाचे अधिकारी रमेश करंडे, कविता इंदलकर, नंदा दळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)