Amarnath | "संथ नदी अचानक समुद्रासारखी खवळली, दरडही कोसळली अन् काळजात धस्स झाले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:18 IST2022-07-11T10:54:10+5:302022-07-11T11:18:25+5:30
सोनवणे यांनी सांगितला अमरनाथ यात्रेतील आपबीतीचा अनुभव...

Amarnath | "संथ नदी अचानक समुद्रासारखी खवळली, दरडही कोसळली अन् काळजात धस्स झाले"
-नारायण बडगुजर
पिंपरी : अमरनाथ येथे संथ वाहणाऱ्या सावित्री नदीने अचानक खवळलेल्या समुद्रासारखे रौद्ररूप धारण केले, दरडही कोसळायला लागली. त्यामुळे काळजात धस्स झाले. केदारनाथ दुर्घटनेच्या आठवणीने चर्रर झाले. आता सर्व काही संपले, असे वाटून सर्वांच्या चेहऱ्यावर भीती दाटली. मात्र, आम्ही जिवाच्या आकांताने तेथून अक्षरश: पळत सुटलो अन् कसेबसे बचावलो, असे सांगत आकुर्डी येथील श्यामला सोनवणे यांनी अमरनाथ यात्रेतील आपबीती कथन केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील ५३ जणांसह १६५ यात्रेकरू २५ जूनला उत्तर भारताकडे रवाना झाले होते. त्यात श्यामला सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, प्रदीप हादगे, विजया हादगे, भारती साळुंखे, शिवाजी पवार, सुजाता पवार हे देखील होते. त्यांनी अमृतसर, वैष्णोदेवी, कोडकोनाई देवीचे दर्शन घेतले. जम्मू येथून शासकीय पास मिळवून ५ जुलैला अमरनाथ येथे गेले. दर्शनानंतर आभाळांनी गर्दी केल्याने भर दुपारी चारच्या सुमारास काळोख दाटला. अमरनाथ गुहेला लागून असलेल्या सावित्री नदीतून पुराचे लोंढे येऊ लागले. तेथे दरड पडून मलबा वाहून येऊ लागला. त्यामुळे सर्वजण घाबरून तेथून पळत सुटल्यासारखे निघाले. बालटालला पोहोचले. तेथून चार किलोमीटर अंतरावर पार्क केलेल्या गाड्यांपर्यंत जाण्यासाठी पुन्हा धावपळ केली. यात्रा व्यवस्थापक कृष्णा महामुनी यांनी सूचना केल्या.
दरम्यान, जोरदार पावसात भिजत सर्वजण कसेबसे गाडीपर्यंत पोहोचलो. गाड्या निघाल्या; परंतु तोपर्यंत परिस्थिती बिकट झाली होती. रस्त्यात दरड कोसळत होत्या. त्यामुळे दोन ठिकाणी पाच तास गाड्या थांबल्या. या प्रवासात ९० महिला, २५ ज्येष्ठ नागरिक, असे १६५ यात्रेकरू होते. दिवसभरापासून चहा, पाणी, जेवण काहीच नव्हते. त्यामुळे प्रचंड त्रास झाला. या प्रसंगात संरक्षण दलाच्या जवानांनीही मदत केली. अतिशय खडतर परिस्थितीत बालटाल येथून जम्मू गाठून बसने अमृतसर येथे यात्रेकरू पोहोचले. तेथून सुखरूपपणे यात्रेकरू पुणे येथे पोहोचले आणि सुटकेचा नि:श्वास सोडला, असे श्यामला सोनवणे यांनी सांगितले.
खवळलेली नदी, कोसळणारी दरड आणि आभाळामुळे झालेला काळोख यामुळे केदारनाथ दुर्घटनेची आठवण झाली. आता आपले काही खरे नाही, आपण घरी कसे पोहोचणार, अशी भीती वाटली. मात्र, घरी सुखरूप पोहोचलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी समजले की, अमरनाथ येथे ढगफुटी झाली. त्यामुळे अंगावर शहारेच आले.
- श्यामला सोनवणे, आकुर्डी.