अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; १५ मिनिटांपूर्वीच झाले होते व्हिडिओ कॉलवर बोलणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 19:39 IST2022-07-09T19:32:14+5:302022-07-09T19:39:46+5:30
ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली...

अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील महिलेचा मृत्यू; १५ मिनिटांपूर्वीच झाले होते व्हिडिओ कॉलवर बोलणे
धायरी: अमरनाथ येथील ढगफुटीत धायरी येथील सुनीता भोसले (वय अंदाजे: ५५, फॉर्चूना सोसायटी, धायरी) या भाविक महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरनाथ यात्रेला ३० जूनला सुरुवात झाली आहे. या अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून काही भाविक गेले आहेत. आळंदी येथील गजानन महाराज सोनुने यांच्या बरोबर एका बसमधून ५० भाविक यात्रेसाठी गेले होते. यामध्ये पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील महेश राजाराम भोसले, सुनीता महेश भोसले हे पती-पत्नी आणि महेश भोसले यांची बहीण प्रमिला प्रकाश शिंदे हे यात्रेसाठी गेले होते. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे दर्शन झाले. दरम्यान अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने त्यात दरड कोसळून सुनिता भोसले यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला असून महेश भोसले व प्रमिला शिंदे या दुर्घटनेतून बचावले आहेत.
१५ मिनिटांपूर्वी व्हिडिओ कॉलवर झाले होते बोलणे...
ही दुर्घटना घडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी यात्रेत गेलेल्या सुनिता भोसले यांनी आपल्या मुलाशी व्हिडीओ कॉलवर बोलल्या होत्या. फोनवर बोलल्यानंतर काही वेळात आई आपल्यात नसल्याची माहिती वडिलांनी फोनवरून मुलाला दिली. या ह्दयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वडगाव बुद्रुक येथील भोसले कुटुंबियांच्या घरी भेट देऊन यासंदर्भात तातडीने आरडीसीबरोबर संपर्क साधत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.