Amarnath Yatra Cloudburst| अमरनाथ दुर्घटनेत पुण्यातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:00 PM2022-07-09T18:00:16+5:302022-07-09T19:37:47+5:30
अमरनाथ यात्रेला गेलेले हजारो लोक अडकले आहेत...
पुणे : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
वडगाव बु. येथील सुनिता भोसले यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली ट्रॅव्हल कंपनीकडून अमरनाथ यांत्रेला गेल्या होत्या. ढगफुटीच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत ५५ यात्रेकरू होते. त्यांचे पार्थिव जम्मूपर्यंत हेलिकॉप्टरने आणण्यात आले आहे. तर आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
#AmarnathCaveCloudBurst#IAF rescue efforts continue unabated inspite of marginal weather.
— Indian Air Force (@IAF_MCC) July 9, 2022
Mi17 V5 & Cheetal helicopters are operating near the site to airlift the mortal remains of casualties, injured persons, NDRF personnel & relief load since this morning. pic.twitter.com/ISDo0diczT
तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.
अमरनाथ ढगफुटीतील मृतांमध्ये पुण्यातील एका महिलेचा समावेश
अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर या घटनेच्या धक्क्यामुळे आणखी एका पुुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
या घटनेत वडगाव बु. (धायरी) येथील सुनिता महेश भोसले यांचा मृत्यू झाला आहे. त्या आळंदीतील माऊली यात्रा कंपनीकडून अमरनाथ यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत ५० यात्रेकरू होते. त्यांची यात्रा पुण्यातून २६ जूनला सुरू झाली होती. याबाबत माऊली यात्रा कंपनीचे संचालक गजानन सोनुने म्हणाले, “भाविकांना शुक्रवारी दर्शन झाल्यानंतर सैन्यदलाने सर्वांना खाली जाण्यासाठी काढले. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. यातील काही लोक पायी, डोली व घोड्यावर बसून खाली येऊ लागले. मात्र, भोसले, त्यांचे पती महेश व नणंद त्यांच्यासोबत होत्या. ते सर्वजण एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते.
त्यावेळी पाऊस सुरू झाल्यानंतर डोंगरावरून आलेला भलामोठा दगड सुनिता यांच्या डोक्यात पडला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी तेथे हजर असलेल्या सैन्याच्या जवानांनी तातडीने त्यांचे पती, नणंद व मृतदेहाला हेलिकॉप्टरने जम्मूला हलवले. तसेच पुण्याच्या पुढील प्रवासासाठी ते सैन्यदलाच्या संपर्कात आहेत. मी व अन्य एकजण अजुनही खाली उतरत आहोत. आमच्या गटातील उर्वरित ४७ जण सुखरूप असून रविवारानंतर आम्ही पुण्याकडे परतणार आहोत.”
सोनुने यांच्या गटामध्ये मरकळ ता. खेड येथील चंद्रकांत भुसे त्यांच्या पत्नीसह आहेत. “शुक्रवारी दर्शन झाल्यावर आम्ही पती पत्नीने पायी उतरण्यास सुरुवात केली. पायी उतरल्याने लवकर बेसकॅम्पवर पोचता येते म्हणून आम्ही हा मार्ग स्वीकारला. मात्र, काही जणांनी डोली व घोड्यांचा आधार घेतला. मृत सुनिता भोसले त्यांचे पती असे सुमारे ३५ लोक मागे राहिले होते. आम्ही रस्त्यात असताना दुपारी चार वाजता पाऊस सुरू झाल्याने सैन्याच्या जवानांनी आम्हाला थांबण्यास सांगितले. तोवर आम्ही मूळ गुहेपासून ५ ते ६ किलोमीटर अंतर पार केले होते. त्यावेळी मंदिराजवळ ढगफुटी झाल्याचे समजले. त्यावेळी कंपनीचे संचालक गजानन सोनुने यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला. पण नेटवर्क नसल्याने संपर्क होत नव्हता. मागे काय झाले हे कळत नव्हते. त्यामुळे आमची चिंता वाढली.
पाऊस थांबल्यावर पुन्हा चालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमच्या फोनची बॅटरी संपली होती. रात्री साडेबारा वाजता आम्ही बालतान येथे पोचले. सततच्या चालण्यामुळे थकलेलो होतो. तोंडाला कोरड पडली होती. हवेत ऑक्सिजनची असल्याने धाप लागत होती. बालतानला पोचल्यानंतर बॅटरी चार्ज केली. तेव्हा घटना घडल्याचे सगळीकडे कळले होते. त्यामुळे सर्वांनी फोनवर चौकशी सुरू केली. सुखरुप असल्याचे सांगितल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर आम्ही सोनुने यांच्या संपर्क साधला. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर सांगितले. तसेच उर्वरित सर्व जण सुखरुप असल्याचे सांगितले.”
आळंदीतीलच गुरुकृपा यात्रा कंपनीकडून २०० जण या यात्रेसाठी गेले होते. त्यातील पिंपरी येथील प्रदीप नाथा खराडे यांचा बेसकम्पवर आल्यानंतर पहाटे चार वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या गटातील इतर सर्व जण सुरक्षित असून रविवारनंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, असेही राजेश देशमुख यांनी सांगितले.
तर याबाबत दोन्ही कंपन्यांशी संपर्क झाला आहे. या घटनेत कुणीही बेपत्ता नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्व यात्रेकरू सुखरूप असून ते लवकरच पुण्यात परतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.