अमराठींचे मराठीप्रेम! शासकीय अधिकारी गिरवताहेत मराठीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 05:56 AM2018-02-27T05:56:50+5:302018-02-27T05:56:50+5:30
‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत.
पुणे : ‘माझा मराठाचि बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दाशब्दांतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त होत असतो. एकीकडे मराठी भाषिक इतर भाषांकडे आकर्षित होत असताना, शासकीय सेवेत रुजू झालेले अमराठी अधिकारी मात्र मराठी भाषेचे धडे आवर्जून गिरवताना दिसत आहेत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस, आयपीएस अशा विविध पदांवर कार्यरत असताना शासकीय, प्रशासकीय अधिकाºयांची देशाच्या विविध भागांमध्ये बदली होत असते. त्याचप्रमाणे, अनेक अधिकारी बदली होऊन महाराष्ट्रात सेवेत रुजू होतात. मराठी भाषेमध्ये खूप गोडवा असून, दैनंदिन वापरासाठी आवर्जून भाषा शिकल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मराठी ही खूप समृद्ध भाषा आहे़ मी मूळची मराठी नसले तरी पोलीस सेवेत भरती झाल्यानंतर महाराष्ट्रात माझी नियुक्ती झाली़ अकोलानंतर सांगली येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली़ पश्चिम महाराष्ट्र हा मराठीचा गडच़ तेथे प्रामुख्याने मराठीच बोलले जाते़ त्यामुळे माझ्याबरोबर असलेले कॉन्स्टेबल, हवालदार, अधिकाºयांनी मला मराठी शिकवले़ त्यामुळे मी लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधून त्यांच्या तक्रारीची दखल घेऊ शकले़ पुणे हे तर मराठीचे माहेरघऱ येथे आल्यावर माझी मराठी आणखी सुधारली़ पुण्यातील बहुतांश लोक मराठीत बोलत असल्याने त्यांच्याशी बोलताना खूप जपून बोलावे लागते़ माझी मराठी भाषा अजूनही पुण्यातील लोकांसारखी नसली तरी मी काय म्हणते, ते लोकांना चांगले समजते़ मी मराठी बोलू, वाचू शकते़ लिहू शकते़ मी अनेक मराठी पुस्तके वाचली आहेत़ या वाचनातून
मराठी ही समृद्ध भाषा किती समृद्ध आहे, याची प्रचिती आली़ सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!
- रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त, पुणे
भारतीय प्रशासकीय सेवेत जो प्रांत सेवेसाठी मिळेल तेथील भाषा शिकावीच लागते. मराठीशी माझी ओळख तेव्हाच झाली. नोकरीसाठी जवळ केलेली ही भाषा आता आता प्रेमाची भाषा झाली आहे. सुरूवातीला उच्चार नीट यायचे नाहीत, गडबड व्हायची, पण हळूहळू नीट समजायला लागले. या भाषेची वैशिष्टये लक्षात यायला लागली. शब्दांवर जोर थोडा वेगळा दिला तर त्यातून कसा उपरोध निर्माण करता येतो, इतकी माझी समज आता वाढली आहे. शब्दोच्चार हे या भाषेचे एक वेगळेच सामर्थ्य आहे. त्याला तोड नाही. ‘माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृताते पैजा जिंके’, हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे, ते खरे आहे. मी भाषेने आता पूर्ण मराठी झालो आहे इतके की मला स्वप्नही मराठीत पडतात. माझी मराठी व मी मराठी असे झाले आहे.
- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त
मला पुण्यात येऊन अडीच वर्षे झाली आहेत. त्यापूर्वी काही दिवस भुसावळमध्ये होतो. तिथेच पहिल्यांदा मराठीशी संपर्क आला. मराठी भाषा ही हिंदीशी मिळतीजुळती असल्याने ती बोलायला आणि शिकायला फारशी अडचण येत नाही. मराठी ही खूप गोड आणि समृध्द भाषा असल्याबाबत दुमत नाही. ही लोकसंस्कृतीची भाषा आहे. माझ्या मनात या भाषेविषयी खूप सन्मान आहे, यापुढेही राहील. अडीच वर्षांमध्ये आता मराठी बोललेले सर्व समजते. वाचता येते. तसेच सातत्याने बोलण्याचाही प्रयत्न करतो. स्थानिक लोकांचा सातत्याने संवाद होत असल्याने त्यासाठी मदत होते.
- मनोज झंवर,जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे, पुणे विभाग
२००३ मध्ये आयएएस झाल्यावर प्रथम महाराष्ट्र केडर असल्याने मराठी भाषा शिकणे अनिवार्य होते. एक वर्षांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत मराठी भाषाची प्राथमिक शिक्षण देण्यात आले. परंतु, प्रत्येक फिल्डवर गेल्यावरच मराठी भाषा, येथील संस्कृती, माणसे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. त्यात हिंदी आणि मराठी भाषेची लिपी एकच असल्याने व संस्कृत भाषेबद्दल आकर्षण असल्याने मराठी भाषा सहज शिकत गेलो.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी