प्रशस्त जेएम रोडचा बट्ट्या‘बोळ’
By admin | Published: May 15, 2017 06:48 AM2017-05-15T06:48:39+5:302017-05-15T06:48:39+5:30
पुण्यातील प्रशस्त आणि सर्वाधिक उत्तम स्थितीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचा बोळ करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू झाले आहे.
विश्वास खोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील प्रशस्त आणि सर्वाधिक उत्तम स्थितीतील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचा बोळ करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना होणाऱ्या प्रशस्त फुटपाथमुळे १०० फुटी रस्ता असे बिरुद मिरवणारा जंगलीमहाराज रस्ता चिंचोळा बोळ होणार आहे. याबाबत आता स्थानिक नागरिकच आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
पुणे महापालिकेने स्मार्ट सिटी होण्यासाठी अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी परदेश दौरे केले. परदेशातील प्रशस्त फुटपाथ, तेथून निवांतपणे पायी जाणारे नागरिक आणि तेथील आल्हाददायक वातावरण पाहून महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पुण्यातही हेच चित्र उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी संभाजीमहाराज उद्यानाच्या परिसरातील जंगलीमहाराज रस्त्याची निवड करण्यात आली आहे. रस्त्याच्या एका बाजुला सुंदर फुटपाथ करण्यात आला आहे. विविध आकर्षक झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे या रस्त्यावरील पार्किंगची व्यवस्था बंद झाली आहे. आता रस्त्याच्या दुसऱ्या बाजुलाही याच पद्धतीचा फुटपाथ सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आताच येथे वाहतूककोंडीला सुरुवात झाली आहे. एकेरी रस्ता असूनही सायंकाळच्या वेळी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत आहे.
या रस्त्याच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य श्रीकांत शिरोळे म्हणाले, ‘‘पुण्यात पूर्वी बोळवजा रस्ते खूप होते. जंगलीमहाराज रस्ता ८० फुटी रोड म्हणून १९७० च्या दशकात प्रसिद्ध होता. नंतर त्याचे रुंदीकरण करून १०० फूट रुंद करण्यात आला. रुंद होऊनही त्याच्यावर वाहतूककोंडीची समस्या कायम आहे. अशा स्थितीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली जंगलीमहाराज रस्त्याचे रूपांतर महानगरपालिकेने बोळामध्ये केले आहे.’’
‘लोकमत’शी बोलताना शिरोळे म्हणाले, ‘‘१९७५ मध्ये मी स्थायी समितीवर होतो. रिकांडो कंपनीने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कंत्राट १० लाख रुपयांमध्ये स्वीकारले. १ जानेवारी ७५ ते ८५ दरम्यान या रस्त्याला एकही भेग पडली तर रस्ता विनामूल्य दुरुस्त करून देऊ, अशी हमी या कंपनीने दिली होती. त्यामुळे हा रस्ता खड्डेविरहीत रस्ता म्हणूनही अनेक वर्षे स्मरणात होता. ८० फूट रस्ता असताना दुहेरी वाहतूक होती. नंतर १०० फूट झाल्यानंतर वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे एकेरी वाहतूक करूनही वाहतूककोंडी होतच राहिली. पूर्वी या रस्त्यावर बंगले असल्याने वाहनांची वर्दळ कमी होती. या बंगल्यांचे व्यावसायिक रूपांतर झाल्याने येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे १०० फूट असलेला रस्ताही अरुंद बनला. आता त्यात सुशोभीकरणाची भर पडून तो आणखी अरुंद केला गेला. केवळ २ किलोमीटरचा रस्ता सुशोभित करून सबंध शहरातील सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचे महापालिका आयुक्तांचे आयुक्तांचे तार्किक मला समजलेले नाही. रस्त्याचे सुशोभीकरण करण्यापूर्वी नागरिकांचा परिसंवाद घेणे, त्यांची मते घेणे आवश्यक होते. त्यातच मेट्रोसाठी सुशोभीकरण उखडून टाकणार, अशी चर्चा आहे. असे असेल तर अवाढव्य खर्च कशासाठी? पिंपरी-चिंचवडमधील रस्ते बऱ्यापैकी कोंडीमुक्त आहेत. पुण्यातील उपनगरांकडे जाणारे मोठे रस्ते सायंकाळी वाहतुकीने प्रचंड गजबजलेले असतात. पाऊण तासाशिवाय या रस्त्यावरुन पुढे सरकतच येत नाही.
- श्रीकांत शिरोळे,
माजी स्थायी समिती सदस्य