मनसे कार्यकर्त्यांकडून अॅमेझॉन कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:08+5:302020-12-26T04:10:08+5:30
‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ही मोहिम मनसेने सुरू केली आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ...
‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ही मोहिम मनसेने सुरू केली आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस बजावली. त्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. मनसेच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी कोंढवा येथील अॅमेझॉन कार्यालयात जाऊन तोडफोड केली. तेथील नामफलकाला काळे फासले. या वेळी कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
---------
प्रभाग अध्यक्ष अमित जगताप व कार्यकर्त्यांनी अॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड केली आहे. अन्य भारतीय भाषांचा पर्याय अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर आहे. पण मराठीला डावलले गेले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत सनदशीर मार्गाने विचारणा केली होती. त्यांनी मात्र पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला.
- साईनाथ बाबर, नगरसेवक
------------