बालेवाडीसह अंबडवेट गावावर शोककळा; मुळा नदीकाठी वरखडे कुटुंबातील तिघांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:57 PM2018-01-27T18:57:03+5:302018-01-27T19:03:37+5:30
केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या खासगी बस दुर्घटनेत बसचालकासह १३ जणांना जलसमाधी मिळाली. यातील वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पौड : २६ जानेवारी व त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवार या सुटीच्या निमित्ताने एका खासगी बसने कोकण व कोल्हापूरच्या सहलीसाठी गेलेल्या केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या खासगी बस दुर्घटनेत बसचालकासह १३ जणांना जलसमाधी मिळाली. यातील वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या दुर्घटनेत बालेवाडी येथील संतोष वरखडे हे आपली पत्नी, दोन मुली तसेच बालेवाडी येथील मेहुणे सचिन केदारी व त्यांचे कुटुंबीय, तसेच नागरे कुटुंबीयातील त्यांची मेहुणी व त्यांची दोन मुले आणि बसचालकासह एकूण १६ जणांना घेऊन शुक्रवारी देवदर्शनाला गेले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अंबडवेट येथील संतोष वरखडे व त्यांच्या दोन मुली गौरी आणि ज्ञानेश्वरी यांचे मृतदेह कोल्हापूर येथे शवविच्छेदन करून दुपारी दीडच्या सुमारास अंबडवेट येथे आणण्यात आले. या बाप-लेकींवर मुळा नदीकाठी दुपारी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील एकाच वेळी तिघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. संतोष वरखडे हे साप्ताहिक श्वासचे संपादक व पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू होत.
गौरी व ज्ञानेश्वरी या दोघी वारज्यातील आरएमडी शाळेत शिकत होत्या. गौरी इयत्ता दहावीत तर ज्ञानेश्वरी नववीत शिकत होती. अभ्यासात हुशार असणाऱ्या आपल्या मुलींच्या शिक्षणाची उत्तम सोय व्हावी, याकरिता संतोष वरखडे हे पिरंगुट येथे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. जाण्या-येण्याच्या सोयीसाठी ते पिरंगुट येथे राहायला गेले होते. या अपघातात संतोष वरखडे यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीच परिस्थिती बालेवाडी येथील केदारी व नागरे कुटुंबीयांवर कोसळली आहे.