विदर्भातील जलसाक्षरतेची जलदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:54+5:302021-07-17T04:10:54+5:30
२२ वर्षीय अवलीया तरुणीचा : आठ महिन्यांपासून सायकलवर १० हजार किमी प्रवास --- बारामती : यवतमाळ जिल्ह्यातील पूनवट ...
२२ वर्षीय अवलीया तरुणीचा : आठ महिन्यांपासून सायकलवर १० हजार किमी प्रवास
---
बारामती : यवतमाळ जिल्ह्यातील पूनवट गावाची २२ वर्षीय तरुणी प्रणाली चिकटे सायकलवर १० हजार किमी प्रवासाचा टप्पा ओलांडत शनिवारी(दि १७) बारामतीत पोहचणार आहे. गेल्या २७१ दिवसांपासुन हि अवलीया तरुणी जलसाक्षरतेची जलदूत बनून पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तीकरणाचा प्रसार करण्यासाठी सायकलवरुन महाराष्ट्र भ्रमण करीत आहे.
मागील एक वर्षात १०,०००किलोमीटर चा प्रवास केला आहे. यशदा जलसाक्षरता विभागा अंतर्गत प्रशिक्षण घेताना तिला जलसाक्षरतेच्या प्रसाराचे महत्व समजले. त्यानंतर तिने हे आव्हान पेलत प्रवास सुरु केला.आज प्रणाली उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेणार आहे.जलसाक्षरता केंद्र यशदाचे माजी कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांच्याशी संपर्क साधला. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी प्रणालीची भेट घालून देण्याची मुसळे यांना विनंती केली. त्यानुसार ही भेट होत आहे.
जलसाक्षरता केंद्र यशदाचे माजी कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, ३० वर्षांपूर्वी ४५ ते ७० दिवस पाऊस पडत होता. आता हे प्रमाण १५ ते २० दिवसांवर आले आहे. पावसाचे प्रमाण तेवढेच आहे. मात्र, ढगफुटी, अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. शेतजमीन वाहूून जात आहे. नदीत गाळाचे प्रमाण वाढत आहे. जमीनीची प्रतवारी घसरली आहे. परीणामी शेती उत्पादनावर परीणाम झाला आहे. यासाठी जलसाक्षरता महत्वाची आहे. प्रणालीने एका प्रशिक्षणात याचे महत्व ओळखून स्वयंप्रेरणेने विनामानधन हा प्रवास सुरु केला आहे. ती एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे.जलसाक्षरतेसह पर्यावरण जागृतीवर ती या प्रवासात काम करीत आहे.हि माहिती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवुन देणार आहे.
तसेच प्रणाली चिकटे हिने सांगितले कि, साडेआठ महिन्यांपासून तिने घर सोडले आहे.शनिवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहे.त्यानंतर कृषि विज्ञान केंद्राला भेट देणार आहे.तसेच बारामतीकरांशी महिला सबलीकरण,जलसाक्षरतासह पर्यावरण जागृतीबाबत संवाद साधणार आहे.
—————————————
फोटोओळी—प्रणाली चिकटे
१६०७२०२१ बारामती—०८
————————————