बळ दे झुंजायला! आंबेडकरी चळवळीतल्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची 'संघर्षगाथा'!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:30 PM2020-04-15T13:30:12+5:302020-04-15T13:37:33+5:30
आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता उपेक्षितच...पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही...
नम्रता फडणीस
पुणे : पत्नी कर्करोगाने ग्रस्त...उपचारासाठी पैसे नाहीत...घरात अन्नाचा कण नाही...लॉक डाऊनमुळे घराबाहेर पडता येणे शक्य नाही.....ही बिकटपरिस्थिती आहे, आंबेडकरी चळवळीला ध्यासपर्व मानणाऱ्या एका बंडखोर निष्ठावंत कार्यकर्त्याची आंबेडकरी चळवळ म्हणजे एक आई आहे आणि तिच्या पदराला कितीतरी गाठी बांधलेले दारिद्रय आहे. पण त्या गाठींचे लुगडे सोडून तिला पैठणी नेसवल्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत, हा आशावाद त्यांच्या जगण्याला बळ देत आहे.
संत कबीर, महात्मा फुले, नामदेव ढसाळ यांचे विचार हेच जगण्याचे अधिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्वास असलेल्या या कार्यकर्त्याचे नाव आहे शरद गायकवाड. ते व्यवसायाने रांगोळीकार. पत्नी आणि आठ वर्षांचा मुलगा हा त्यांचा परिवार. शिक्षण फारसे घेता आले नसले तरी डॉ. आंबेडकर यांचे सर्व साहित्य त्यांनी पिंजून काढले आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या महामानवाला ते रांगोळीच्या माध्यमातून अभिवादन करतात. मात्र पत्नीच्या कर्करोगाच्या आजारामुळे त्यांचा आता जगण्याचा खडतर प्रवास सुरू झाला आहे. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनाची प्रेरणा घेत त्यांच्या विचारांवरच त्यांनी मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. शरद गायकवाड यांनी 'लोकमत' शी बोलताना आंबेडकरी चळवळीच्या कटू वास्तवाची कहाणी विशद केली.
ते म्हणाले, आजही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा उपेक्षितच राहिला आहे.चळवळीचा कार्यकर्ता हा आजही स्वयंप्रकाशित नाही. त्याच्याकडे ना साखरकारखाने, ना कोणता उद्योग आहे. गेल्या 70 वर्षाच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा विकास झाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेतलेला आणि घोषणा देणारा कार्यकर्ता हा स्वकमाईवरच जगत असतो. आंबेडकरी चळवळीचा लाभ हा बहुतांश पुढा-यांना होतो. कार्यकर्ते हे वंचितच राहातात. कार्यकर्त्यांचे दहा बाय दहाचे घर असते आणि तो झोपडपट्टीतील रोजची जगण्याची लढाई लढत असतो. मिळेल ते काम करतो. पण बाबासाहेबांच्या झेंड्याशी प्रामाणिक राहतो. आज माझी बायको कर्करोगग्रस्त आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र केमोचा खर्च परवडणारा नाही. तरीही कुणाकडे मदतीचे आवाहन केलेले नाही. मित्रमंडळी जमेल तसे मदत करत आहेत. घरात डॉ.आंबेडकर आणि नामदेव ढसाळ यांची संघर्षमयी प्रेरणादायी पुस्तके आहेत. तिचं जगण्याला बळ देतात.
दरवर्षी आंबेडकर जयंतीला लाखो रुपए खर्च करून होणाऱ्या कार्यक्रमांवरही गायकवाड यांनी आक्षेप नोंदविला. हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारे आर्थिक शोषणच आहे. बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेली जयंती नाचून, गाऊन धिंगाणा घालून साजरी करायची नाहीये. तर शैक्षणिक स्तरावर ती साजरी होणं अपेक्षित आहे. समाजातील नामवंत आणि बुध्दीजीवी मंडळींनी पाच मुलांना जरी दत्तक घेतले असते तरी समाजाची शैक्षणिक प्रगती नक्कीच झाली असती. डॉ. बाबासाहेबांनी ज्या शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. त्या तालुका किंवा गावपातळीवर पुढे नेण्याची त्यांची जबाबदारी होती. पण त्यांनी केले नाही. आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी पुस्तके लिहून, गाणी गाऊन बाबासाहेबांच्या नावाने पैसे कमावले. पण त्या पैशांचा समाजाला फायदा करून दिलात का? असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.
------------------------------------------------------------------------------------