आंबेडकर समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:37+5:302021-04-15T04:09:37+5:30
इंदापूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वाचनाने, चिंतनाने आणि लेखनातून प्रचंड शक्ती उभी केली. या प्रखर ...
इंदापूर : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वाचनाने, चिंतनाने आणि लेखनातून प्रचंड शक्ती उभी केली. या प्रखर संपत्तीच्या, शक्तीच्या जोरावरच बाबासाहेबांनी बहुजन समाज सर्वशक्तीनिशी जागा केला. त्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. आत्मसन्मान, स्वाभिमान आणि सन्मानाची जाणीव बाबासाहेबांनी करून दिली. म्हणून बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने समस्त मानव जातीचे प्रेरणास्रोत आहेत, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी केले.
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती आयोजित करण्यात आली होती. या वेळी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस गलांडवाडी नं.२ चे माजी सरपंच गोपीचंद गलांडे व संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामूहिकरीत्या बुद्धवंदना करीत पंचशील व त्रिशरण घेण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेबांचा जयजयकाराच्या घोषणा देत, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड.समीर मखरे, संचालक राहुल सवणे, श्रीमती शकुंतला मखरे, अनार्या मखरे, सामाजिक कार्यकर्ते संजय सोनवणे, गोरख तिकोटे, गोरख चौगुले व संस्थेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या सविता गोफणे यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबराव पवार व प्राचार्या अनिता साळवे - मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रमस्थळी कोविड- १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली.
--
फोटो क्रमांक - १४ इंदापूर वसतीगृह अभिवादन
फोटो ओळ : इंदापूर येथे भिमाई आश्रम शाळेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना रत्नाकर मखरे.