आंबेडकरांचे अर्थशास्त्रातील योगदान समोर यावे
By Admin | Published: April 15, 2015 12:57 AM2015-04-15T00:57:49+5:302015-04-15T00:57:49+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही,
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दलितांचे, उपेक्षितांचे नेते म्हणून पाहिले जाते. परंतु, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेली नाही, अशी खंत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीनिमित्त आणि सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या कोनशिला समारंभाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, संजय काकडे, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. आंबेडकर स्मारक व संग्रहालयाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रीय जल आयोगाची निर्मिती आंबेडकरांनी केली तसेच भाक्रा नांगलसारखा मोठा प्रकल्प तयार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथे पाणी घेऊन जाण्याचा विचार आंबेडकरांनी केला. राज्या-राज्यांत विद्युत मंडळांची स्थापना करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यामुळे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून देशाच्या विकासासाठी आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक विचार समाजासमोर यायला हवेत.’’
गिरीश बापट म्हणाले, ‘‘महामानवाच्या पुतळ्याला हार घालून भावना व्यक्त होतात. परंतु, एखाद्याचे जीवन उभे करण्यासाठी त्याला मदत करण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी घ्यायला हवी.’’
लिखाणाची जबाबदारी स्वीकारावी
विकासातील आंबेडकरांचे योगदान, त्यांचे आर्थिक विचार यावर लिखाण करण्याची जबाबदारी स्वीकारावी. अभ्यासू व्यक्तीची नियुक्ती सिम्बायोसिससारख्या संस्थेने करावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
टागोरांच्या विश्वभारती आणि सानेगुरुजींच्या आंतरभारती संकल्पनेप्रमाणे देशाला आज समानता, ऐक्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजात ‘ऐक्य भारती’ ही संकल्पना रुजविणे आवश्यक आहे.
- शां. ब. मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष, सिम्बायोसिस