आंबेडकरांचे सुरक्षाविषयक विचार पूरक

By admin | Published: May 26, 2017 06:06 AM2017-05-26T06:06:54+5:302017-05-26T06:06:54+5:30

विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. खरे यांच्या ‘संरक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘अंतर्गत सुरक्षातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या दोन ग्रंथांना महाराष्ट्र साहित्य

Ambedkar's security considerations are complementary | आंबेडकरांचे सुरक्षाविषयक विचार पूरक

आंबेडकरांचे सुरक्षाविषयक विचार पूरक

Next

विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. खरे यांच्या ‘संरक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘अंतर्गत सुरक्षातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या दोन ग्रंथांना महाराष्ट्र साहित्य परिषेदचा शरदचंद्र मनोहर भालेराव (लक्षवेधी साहित्य ग्रंथ) पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्त डॉ. खरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या सुरक्षाविषयक विचारांचा ऊहापोह केला.
खरे म्हणाले, आपल्या देशात डॉ. आंबेडकर यांना दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यापुरतेच मर्यादित ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांनी सुरक्षा, पाणी, परराष्ट्र धोरण अशा विविध मुद्यांवर विपुल लेखन करून आपले विचार मांडले आहेत. राज्यघटनेमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसून येते.
मात्र, या विचारांकडे आजतागायत पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे हे विचार पुढे येणे आवश्यक आहे. आजच्या काळातही हे विचार कसे सुसंगत आहेत, हे जगासमोर आणण्याच्या दृष्टीने विचार केला. त्यानुसार देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेबाबत त्यांच्या विचारांचा अभ्यास व संशोधन करून ग्रंथरूपाने ते विचार समोर आणण्यात आले आहेत.
मागील अनेक वर्षांच्या भारत-पाकिस्तान मुद्यावरही आंबेडकरांनी आपल्या ‘थॉट्स आॅन पाकिस्तान’ या पुस्तकातून अनेक उपाय सुचिवले आहेत. तेव्हाची व आजच्या स्थितीत फरक पडला असला तरी त्यांचे मूळ विचारांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. हा भूमीचा प्रश्न नसून वैचारिक संघर्ष आहे. बहुसंख्याक व अल्पसंख्याक हाही संघर्षाचा मुद्दा आहे.
पुस्तकामध्ये त्यांनी त्यावर आपली भूमिका मांडली आहे. चीन सोबतच्या संबंधांवरही त्यांनी प्रभावीपणे आपली मते मांडली आहे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी राज्यघटनेमध्ये आणीबाणीविषयक ३५२, ३५६ आणि ३६० ही कलमे खूप महत्त्वाची आहेत. देशाची एकता, अखंडता, कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी त्याचा वापरही करण्यात आला आहे.
आंबडेकरांच्या या भूमिकेवर कुठेही फारशी चर्चा झालेली दिसत नाही. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय शांतता याबाबतही त्यांचे विचार मौलिक आहेत. जगात शांतता टिकविण्यासाठी संयुक्त राष्ट्र कार्यरत आहे. सुरक्षा परिषदेचे १९३ देश सदस्य आहेत. त्यापैकी अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन व इंग्लंड हे पाच देश त्याचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. ५०च्या दशकामध्ये चीनऐवजी भारताला कायमस्वरूपी सदस्य होण्याची संधी होती.
डॉ. आंबेडकरांनी त्या वेळी तत्कालीन सरकारला कायम स्वरूपी सदस्यत्व घेण्याबाबत सुचविलेही होते. अमेरिकेचीही ही मागणी होती. पण त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केल्याने चीनला ही संधी मिळाली. आता आपल्याला हे सदस्यत्व मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान न्यायालयाचा फाशीचा निर्णय रद्द केल्यास चीन त्याला विरोध करू शकते. सुरक्षा परिषदेत चीनने नकाराधिकार वापरल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल मान्य करणे पाकिस्तानला बंधनकारक राहणार नाही, असे डॉ. खरे यांनी सांगितले.
आजच्या काळात आंबेडकरांचे सर्व विचार सुसंगत आहे. प्रामुख्याने त्यांचे सुरक्षाविषयक विचार पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठामध्ये ‘आंबेडकर्स थॉट्स आॅन इंडियाज नॅशनल सिक्युरिटी’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
देशात पहिल्यांदाच असा अभ्यासक्रम करण्यात आला आहे. देशाची सुरक्षितता, एकता, अखंडता याबाबत आंबेडकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरेल.
आजच्या स्थितीत आंबेडकरांच्या सुरक्षाविषयक भूमिकेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ‘संरक्षणतज्ज्ञ आंबेडकर’ ही मांडणी करताना त्यांच्या या विचारांचा ऊहापोह होणार आहे.

Web Title: Ambedkar's security considerations are complementary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.