पुण्यातील आंबेगाव कचरा प्रकल्पाला संतप्त जमावाने लावली आग, अज्ञातांनी फोडले कार्यालय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 06:43 PM2020-11-01T18:43:47+5:302020-11-01T18:45:49+5:30
Pune News : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे
पुणे - आंबेगाव बुद्रुक येथील सर्वे नंबर ५१ मधील आरक्षित जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामुळे आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, दत्तनगर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या कचरा प्रकल्पाला आग लावली. तसेच काही अज्ञात व्यक्तींनी ऑफिसची तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि.१) घडली आहे.
आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या परिसराचा गेली तीन वर्षापूर्वी महानगरपालिकेत समावेश झाला आहे. महापालिका समावेशनांत्तर कोणताही ठोस विकास निधी या भागासाठी मिळाला नाही. परंतु असे असतानाही कचरा प्रकल्प मात्र आंबेगावकरांचे माथी मारल्याने नागरिक तीव्र नाराजी असून रविवारी या संदर्भात आंबेगाव येथील भैरवनाथ मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व पक्षाचे नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
यावेळी आंबेगाव चे फुरसुगी होऊ देणार नाही. मनपा प्रधासनाच्या जाहीर निषेध अशा घोषणा दिल्या. बैठकी नंतर संतप्त नागरिकांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प येथे मोर्चा काढला तसेच प्रकल्पासाठी जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला. तसेच या संतप्त नागरिकांपैकी काही अज्ञात युवकांनी प्रकल्पाला आग लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच या प्रकल्पाचे कार्यालय फोडण्यात आले असून मोठे नुकसान करण्यात आले आहे. यामध्ये टेबल, खुर्ची, टीव्ही यासारख्या साहित्याचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. या ठिकाणी कचऱ्याला आग लावल्याने धुराचे लोट परिसरात पाहायला मिळाले. आग विझवण्यासाठी कात्रज अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यांनी थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांच्यासह वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने उपस्थित होते. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.