मावळची ओळख असलेला आंबेमोहोर तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 11:26 AM2022-08-25T11:26:55+5:302022-08-25T11:27:59+5:30

आंबेमोहोर तांदूळ मावळ तालुक्यातून हद्दपार होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर...

Ambemohor rice known as Maval is on the verge of extinction pune latest news | मावळची ओळख असलेला आंबेमोहोर तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर..!

मावळची ओळख असलेला आंबेमोहोर तांदूळ नामशेष होण्याच्या मार्गावर..!

googlenewsNext

- योगेश घोडके

शिवणे मावळ :मावळ तालुका हे पावसाचे माहेर घर मानले जाते. तालुक्यामध्ये पावसाळ्यात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे भाताचे पीक तालुक्यामध्ये अनेक प्रकारची भाताची पिके घेतली जातात. परंतु, गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी आंबेमोहोर तांदूळ खूप प्रसिद्ध होता. आंबेमोहोर हा तांदूळ चवदार व सुवासिक असल्यामुळे या तांदळाचे मावळात मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून आंबेमोहोर तांदूळ मावळ तालुक्यातून हद्दपार होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

आंबेमोहोर तांदूळ मावळातच नव्हे तर पुणेपुणे जिल्ह्याबाहेरच्या बाजारपेठेत ही चवीसाठी प्रसिद्ध असलेला सुवासिक तांदूळ आता पूर्णपणे हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. नगण्य क्षेत्रामध्ये काही शेतकरी त्याचे पीक घेत आहेत. शेतात पीक उभे असताना वाऱ्याची झुळक आली तरी आसपासच्या परिसरात आंबेमोहोरचा वास दरवळत असे मात्र या प्रकारचा सुवासिक तांदूळ सध्या कमी प्रमाणात आढळत आहे. सध्या काही भागात आंबेमोहोर तांदूळ मिळतो. त्याला रासायनिक खताच्या वापरामुळे पूर्वीसारखा वास व चव राहिलेली नाही.

पंचवीस वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वडगाव मावळ येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये इंद्रायणी जातीचे भाताचे बियाणे विकसित करण्यात आले. इंद्रायणीची उत्पादकता इतर जातीच्या भातापेक्षा अधिक असल्यामुळे आणि त्याची चव व वास चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताला प्राधान्य दिले. साहजिकच त्याचा प्रसार पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या इतर भागात झपाट्याने झाला.

इंद्रायणीच्या आगमनामुळे आंबेमोहोरसह रत्नागिरी २४, रत्ना, कोळंबा, कर्जत १८४, काळी कुसळ, वरंगळ, जिरायत, पार्वती व स्थानिक जातींचे उत्पादन मागे पडले आहे. चव आणि वास याबाबत इतर तांदळांपेक्षा इंद्रायणी सरस असला तरीही आंबेमोहोरची जागा इंद्रायणीला घेता आलेली आहे, असे ज्येष्ठ शेतकरी सांगतात.

आंबेमोहोर भाताचे पिक पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मावळ तालुक्यामध्ये ९० टक्के होते. इतर भाताची पिके १० टक्के होती. गेल्या वर्षी इंद्रायणी भात ९० टक्के, आंबेमोहोर ३ टक्के व इतर भात पिके ७ टक्के घेतली गेली.

आंबेमोहोर तांदळाच्या उत्पादनाचा खर्च अधिक व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली. आंबेमोहोर भात उत्पादनाचा खर्च व पीक येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे व वादळी पावसामध्ये आंबेमोहोर शेतामध्ये आडवा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे एकेकाळी आंबेमोहोर तांदळाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यातच त्याचे उत्पादन जवळपास बंद झाले आहे. चवीसाठी प्रसिद्ध असलेला हा सुवासिक तांदूळ आता मावळातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.

आंबेमोहोर भाताचे बियाणे मिळत नाही तसेच भात अधिक उंच होत असल्यामुळे ते शेतीमध्ये आडवे पडते. आंबेमोहोर पिकाला संपूर्णपणे तयार होण्यासाठी इतर भातापेक्षा अधिक कालावधी लागतो. आंबेमोहोर भात पीक घेण्यासाठी अधिक मनुष्यबळ लागते. आंबेमोहोर हा मार्केटमध्ये जास्त किमतीमध्ये विकला जाणारा तांदूळ आहे. त्यासोबतच मार्केटमध्ये चांगली मागणी देखील आहे. आंबेमोहोर हे स्थानिक वाण आहे. त्याचे सर्वांनी जतन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी स्थानिक वाण टिकवण्यासाठी आंबेमोहोर तांदळाचे पीक घेणे आवश्यक आहे.

- दत्तात्रय पडवळ, कृषी अधिकारी, मावळ.

Web Title: Ambemohor rice known as Maval is on the verge of extinction pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.