आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीचा वाद न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:46+5:302021-02-06T04:19:46+5:30
पुणे : अतिवृष्टीमुळे पुण्यात आलेल्या पुरात सर्वाधिक नुकसान झालेल्या आंबिल ओढ्याच्या कडेला सीमाभिंती बांधण्यासाठी पालिकेने दुसऱ्यांदा राबविलेली निविदा प्रक्रिया ...
पुणे : अतिवृष्टीमुळे पुण्यात आलेल्या पुरात सर्वाधिक नुकसान झालेल्या आंबिल ओढ्याच्या कडेला सीमाभिंती बांधण्यासाठी पालिकेने दुसऱ्यांदा राबविलेली निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे. पहिल्यांदा निविदा प्रक्रिया राबवून काम दिलेल्या ठेकेदाराने कार्यादेश घेऊनही पाच महिने काम सुरु केले नव्हते. त्यामुळे पालिकेने ही निविदा रद्द करुन पुनर्निविदा प्रक्रिया राबविली. त्यामुळे पहिल्या ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने पालिकेला सोमवारपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे.
पुरामुळे पुन्हा लगतच्या वस्त्या व सोसायट्यांमध्ये पाणी शिरून नुकसान अथवा जीवितहानी होऊ नये याकरिता निविदा प्रक्रिया राबवून काम करण्याचा निर्णय घेतला होता. विकास आराखड्याप्रमाणे आंबिल ओढ्याची मोजणी करून काम सुरू करावे, अशी भूमिका घेतली होती. मात्र ठेकेदाराला आदेश दिल्यानंतरही त्याने दिरंगाई करीत कामच केले नाही.
पालिकेने त्या ठेकेदाराला नोटीस बजावली. त्यानंतरही काम सुरु न झाल्याने पुनर्निविदा प्रक्रिया राबविली. त्याची मुदत गुरुवारी संपली. शुक्रवारी नव्याने आलेल्या निविदा उघडण्यात येणार होत्या. त्यापूर्वीच ठेकेदाराने या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी कोर्टात धाव घेतली.
आंबिल ओढ्याच्या कामासाठी ३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. सीमाभिंती काम करण्याआधी सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु, ही पाहणी आणि मोजणी करण्याआधीच पालिकेने निविदा काढली. त्यामुळे ठेकेदाराचे हित साधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.