पर्यटनात्मक विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गतीची गरज

By admin | Published: December 22, 2016 01:58 AM2016-12-22T01:58:36+5:302016-12-22T01:58:36+5:30

थंड हवेचे ठिकाण, पर्यटन केंद्र लोणावळा शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी येथील पर्यटनाशी निगडित रखडलेल्या

Ambitious projects need speed for tourism development | पर्यटनात्मक विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गतीची गरज

पर्यटनात्मक विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गतीची गरज

Next

लोणावळा : थंड हवेचे ठिकाण, पर्यटन केंद्र लोणावळा शहरातील पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी येथील पर्यटनाशी निगडित रखडलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी विद्यमान नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
लोणावळा हे शहर मुंबई, पुणे व नाशिक या तीन महत्त्वाच्या शहरांच्या मध्यावर वसलेले असून, येथे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, लोहमार्ग असे पर्याय उपलब्ध आहेत. काही तासांमध्ये या ठिकाणी सहजरीत्या येता येत असल्याने राज्यभरातील पर्यटक लोणावळ्याला पर्यटनासाठी पसंती देतात. असे असले, तरी येथील पर्यटनस्थळांचा योग्य प्रकारे विकास झालेला नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट ही ठिकाणे सोडली, तर इतर आठ महिने पाहण्यासारखे काहीच नाही. उन्हाळयातल तर पर्यटकांना लोणावळ्यात पाहण्याजोगे एकही ठिकाण नसल्याने केवळ थंड हवा एवढेच काय ते लोणावळ्याचे महत्त्व होऊन राहिले आहे. त्यातही जी काही पर्यटनस्थळे आहेत, ती शहराच्या बाहेर ग्रामीण भागात आहेत. तेथील ग्रामपंचायतींचे उत्पन्न अगदी अल्प असल्याने त्या पर्यटनस्थळांचा विकास करू शकत नाहीत.
काही ठिकाणे ही वन विभागाच्या, तर काही भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचा विकास रखडला आहे. केंद्र व राज्य सरकारनेही आत्तापर्यंत लोणावळ्याच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चिक्की व हॉटेलवगळता आजतरी काहीच नसल्याने पर्यटकसंख्याही कमी होऊ लागली आहे. पर्यटन व्यवसाय वाढावा याकरिता मागील काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने हद्दीत रोपवे प्रकल्प, खंडाळा व वलवण तलावात नौकाविहार, तुंगार्ली तलाव परिसरात मनोरंजन नगरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित झाल्यास आमूलाग्र बदल होईल. यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.
आमदार बाळा भेगडे यांनी लोणावळा व परिसराचा तब्बल ४०० कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी दिला आहे. यात शहरासह परिसरातील ग्रामीण भाग राजमाची किल्ला, कार्ला व भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला, पवना धरण, लायन्स पॉइंट या परिसरांचाही समावेश केला आहे. नगर परिषद सदस्य व आमदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यास पर्यटनामध्ये मोठी वाढ होईल. मुख्यमंत्र्यांनीदेखील विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदारांच्या माध्यमातून सदस्य व नगराध्यक्षांनी विकासासाठी केंद्र व राज्याचा निधी मोठ्या प्रमाणात आणावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: Ambitious projects need speed for tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.