कोरोना प्रतिबंधक लस नेण्यासाठी आलेल्या अॅम्बुलन्सला वाहतूक पोलिसांनी लावला 'जॅमर'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:53 PM2021-03-08T18:53:58+5:302021-03-08T18:54:30+5:30
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'कोव्हॅक्सिन' लसीकरणाची मोहीम जोरदारपणे सुरू आहे.
पुणे (उरुळी कांचन) : केंद्र व राज्य सरकार कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोव्हॅक्सिन लस नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेला जॅमर लावण्याची कारवाई पुणे वाहतूक पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शहरातील पंचायत समिती कार्यालयाबाहेर सोमवारी ( दि. ८ ) दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घडली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'कोव्हॅक्सिन' लसीकरणाची मोहीम जोरदारपणे सुरू आहे. या लसीचा पुरवठा पंचायत समिती हवेलीच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रत्येक पी.एच.सी सेंटरला करण्यात येतो, ही कोव्हॅक्सिन लस तापमान नियंत्रित करण्यासाठी शीतगृहात (फ्रीजमध्ये) ठेवणे अत्यंत गरजेचे असते, त्यामुळे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ती लस नेण्यासाठी पुण्यातील पंचायत समिती हवेलीच्या कार्यालयात येत असते व लगेच परत येऊन या लसीच्या बाटल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील फ्रिजमध्ये ठेवून त्याचा लसीकरणासाठी वापर करतात. मात्र त्याच गाडीला जॅमर लावला आहे.
या कारवाईमागचे कारण नेमके काय?
मागील आठवड्यात राज्याचे जबाबदार नेते पंचायत समिती हवेलीमध्ये आले असताना त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर व पंचायत समिती हवेलीच्या परिसरात वाहनांची अस्ताव्यस्त अशी गर्दी दिसल्याने त्यांनी तेथील पोलिस अधिकाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद देऊन वाहतूक नियंत्रण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पंचायत समिती हवेली कार्यालयाच्या आवारात व बाहेर असलेल्या गाड्या लावण्याला प्रतिबंध करून त्यांची गैरसोय केलेली आहे. अशातच कोव्हॅक्सिन लस नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेवर गाड्या कार्यालयाबाहेर रस्त्यावर उभी असताना त्यांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली.
योग्य ती कारवाई व्हावी..
शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे काम हे वाहतूक पोलीस करत आहेत याची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी हवेली पंचायत समितीच्या अनेक सदस्यांनी केली आहे.