अॅम्ब्युलन्स गुदमरतेय वाहतुकीच्या कोंडीत
By admin | Published: December 28, 2016 04:21 AM2016-12-28T04:21:11+5:302016-12-28T04:21:11+5:30
शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर होत असलेली वाहतूककोंडी आणि सामाजिक भान नसलेल्या वाहनचालकांमुळे रुग्णवाहिकांसाठी आता प्रत्येक रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडॉर’
पुणे : शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर होत असलेली वाहतूककोंडी आणि सामाजिक भान नसलेल्या वाहनचालकांमुळे रुग्णवाहिकांसाठी आता प्रत्येक रस्त्यावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करावे लागेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये दोन रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकल्याचे आढळून आले. शहरात दररोज अशा अनेक रुग्णवाहिका अडकत असून, रुग्णांच्या जिवावर बेतत आहे.
वाढत्या वाहनांचा भार शहरातील रस्त्यांना डोईजड होत आहे. वाहतूक पोलिसांकडून ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जातात; मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. सकाळी आणि सायंकाळी शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. स्वारगेट येथील केशवराव जेधे चौक, सोलापूर रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन परिसर, विद्यापीठ चौक, सिमला चौक, संचेती रुग्णालय चौक, बंडगार्डन रस्ता, नेहरू रस्ता, सातारा रस्ता, सेनापती बापट रस्ता यांसह शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूककोंडी असते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत वाहनांची गर्दी सातत्याने असते. कोंडीतून वाट काढताना रुग्णवाहिका चालकांना अथक प्रयत्न करावे लागतात. सध्याची वाहतूककोंडी पाहून असाच ग्रीन कॉरिडॉर प्रत्येक रुग्णवाहिकेसाठी करायचा का, असा प्रश्न पडतो.
वाहतूककोंडीमुळे रुग्णाचा मृत्यू
कोंढव्यातून पूना हॉस्पिटल येथे २ दिवसांपूर्वी ५० ते ५५ वर्षांच्या रुग्णाला नेत असताना स्वारगेट येथील कोंडीमुळे या रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने सांगितले. हा रुग्ण हृदयरोगाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.