आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकेची गरज - वल्लभ शेळके
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:34 AM2018-08-25T00:34:02+5:302018-08-25T00:35:10+5:30
राजुरी (ता. जुन्नर) या गावची लोकसंख्या सतरा ते अठरा हजारइतकी आहे. तसेच या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला बोरी बुद्रुक, जाधववाडी या दोन गावांत उपकेंद्र असून या दोन्ही गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे
राजुरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत असून या आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका द्यावी, अशी मागणी वल्लभ शेळके यांनी केली आहे.
राजुरी (ता. जुन्नर) या गावची लोकसंख्या सतरा ते अठरा हजारइतकी आहे. तसेच या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला बोरी बुद्रुक, जाधववाडी या दोन गावांत उपकेंद्र असून या दोन्ही गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे व या तीनही गावची लोकसंख्या अठ्ठावीस ते तीस हजार आहे. एवढी मोठी लोकसंख्या असल्यामुळे या गावांमध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी नेहमीच असते. तसेच या केंद्रामध्ये दररोजचे शंभराहून अधिक ओपीडी होत असते. रुग्णांना उपचारासाठी मंचर, पुणे या ठिकाणी न्यावे लागते. परंतु येथील केंद्राच्या रुग्णवाहिकेचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाल्याने रुग्णवाहिका बंद पडली आहे. त्यामुळे वाहन नसल्याने येथील डॉक्टरांना खासगी वाहन करून रुग्णांना न्यावे लागत आहे. यामुळे येथील आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.
याप्रकरणी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामप्रसाद धायकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे गेल्या दीड वर्षापासून सतत पाठपुरावा केलेला आहे, परंतु अद्याप आरोग्य केंद्राला वाहन काही मिळाले नाही.
तसेच या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य पाडुरंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की राजुरी व निमगाव सावा येथील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेसाठी जिल्हा आयुक्तांना प्रस्ताव पाठविला असून लवकरच नवीन वाहने येणार आहेत.