ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना ॲम्बुलन्सचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:56+5:302021-04-20T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबत रुग्णांना आरोग्याच्या सुविधा वेळेवर उपलब्ध करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबत रुग्णांना आरोग्याच्या सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रचंड प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना ॲम्बुलन्सचा दर्जा देऊन मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारे टँकर्स आणि वाहने यांच्यावर ॲम्बुलन्सचा दिवा लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
शहर आणि जिल्ह्यात मेडिकल ऑक्सिजन पुरवठा अधिक गतीने आणि सुरक्षित व्हावा यासाठी या वाहनांना ॲम्बुलन्सचा दर्जा दिला आहे. कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सिलेंडर्स असणारी वाहने तसेच टँकर सक्षम यंत्रणा पाईपलाईन यासाठी वाहनांना कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.
ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टँकर सायरन व जीपीएस यंत्रणा बसवण्यात यावी. ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा येऊ नये यासाठी तात्काळ मार्गिका खुल्या कराव्यात. टोल नाक्यावर स्वतंत्र व्यवस्था ठेवावी. तसेच अॅम्बुलन्सविषयक असणारे सर्व नियम ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी लागू असतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.