देहू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:59+5:302021-06-02T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेच्या देहू प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतींनी वित्त आयोगाच्या निधीमधून रुग्णवाहिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेच्या देहू प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ग्रामपंचायतींनी वित्त आयोगाच्या निधीमधून रुग्णवाहिका खरेदी केली. मात्र, ही नवी कोरी रुग्णवाहिका २७ दिवसांपासून बेपत्ता असून, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत लावून धरल्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींनी रुग्णवाहिकांची खरेदी केली. याच उपक्रमांतर्गत ७० रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. देहू प्राथमिक आरोग्य केंद्रासाठीही ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून रुग्णवाहिका खरेदी केली. ही रुग्णवाहिका देहू प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे यांनी सर्वसाधारण सभेमध्ये निदर्शनास आणले.
२७ दिवस ही रुग्णवाहिका सापडत नसल्याने सर्वसाधारण सभेचे मधूनच देहू प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधत खरेदी केलेली रुग्णवाहिका अद्याप आरोग्य केंद्राला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण झाले. सदस्य या प्रकारामुळे संतप्त झाले. शैला खंडागळे यांच्यासह शिवसेना गटनेते देविदास दरेकर, शरद बुट्टे पाटील, आशा बुचके, अतुल देशमुख यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली. या खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेवर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीचे नावही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातून ही रुग्णवाहिका पळवून नेण्यात आली आहे, असे सदस्यांनी सांगूनही योग्य उत्तर आरोग्य विभागाकडून न मिळाल्याने सदस्य आक्रमक झाले. यामुळे सभापती प्रमोद काकडे यांनी या प्रकरणी चौकशी केली करण्याचे आश्वासन दिले. तर अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी कारवाई करण्याचे सांगितले. परंतु या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही, अखेर सदस्यांच्या मागणीनुसार रुग्णवाहिका चोरीला गेली असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर तसेच आदेश प्रशासनाला सभेत देण्यात आले.