रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन मनोरुग्ण तरुणाचा भररस्त्यात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:13 AM2021-09-19T04:13:03+5:302021-09-19T04:13:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एका मनोरुग्ण तरुणाने रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन त्यातील लोकांना खाली उतरवून २ तास भररस्त्यात राडा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका मनोरुग्ण तरुणाने रुग्णवाहिकेचा ताबा घेऊन त्यातील लोकांना खाली उतरवून २ तास भररस्त्यात राडा घातला. पर्वती येथील पुलाखाली शनिवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.
याबाबतची माहिती अशी, एक तरुण अचानक हिंसक झाला. त्याने व्हॅक्सिन घेऊन जाणारी रुग्णवाहिका थांबविली. आरडाओरडा करीत त्यातील लोकांना खाली उतरविले. रुग्णवाहिकेत तो शिरला. त्याने स्टेअरिंगचा ताबा घेतला. त्यामुळे आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली. ही गोष्ट पोलिसांना समजली. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बळाचा वापर करून त्याला रुग्णवाहिकेच्या बाहेर काढले. त्याला कसेबसे आवरत असतानाच त्याने आपल्या अंगावरील कपडे काढून पुन्हा धिंगाणा सुरू केला. पोलिसांना दगडही मारले. तो मनोरुग्ण वाटत असल्याने पोलिसांना बळाचा वापरही करता येत नव्हता. पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ तो शांत बसे, त्यानंतर अचानक पुन्हा आरडाओरडा करून धावण्याचा प्रयत्न करीत होता. ४-५ पोलिसांनाही तो आवरत नसल्याने पोलिसांनी त्याचे हात मागे बांधले. एकदा तो अचानक धावल्याने रस्त्याने जाणाऱ्या गाडीवर जाऊन धडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला खायला दिले. पाणी पाजल्यानंतर तो शांत झाला. निलायमजवळील पुलाखाली २ तास हा प्रकार सुरू होता.
.....
हा तरुण मानसिक आजारी असावा. तो सतत बोलत होता. आम्ही त्याला अन्न दिले. त्यानंतर तो थोडा शांत झाला व स्वत:हून निघून गेला. याबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
कृष्णा इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे