रस्ते मोकळे असतानाही घटनास्थळी रुग्णवाहिका उशिराच; कोरोनाच्या काळात मानवी संवेदना झाल्या बधीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:56 PM2020-05-16T16:56:16+5:302020-05-16T17:11:07+5:30
नाना पेठेत वेळेवर रुग्णवाहिका न पोहचल्याने एका रुग्णाला आपला गमवावा लागला प्राण
पुणे : नाना पेठेत वेळेवर रुग्णवाहिका न पोहचल्याने एका रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. यापूर्वी देखील महर्षीनगर याठिकाणी फुटपाथवर चार तासांहून अधिक काळ पडलेल्या व्यक्तीला शेवटपर्यंत रुग्णवाहिका न्यायला आलीच नाही. एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत असताना दुसऱ्या बाजुला शहरातील कटेंनमेंट भागात रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर होत असल्याचे दिसून आले आहे. एरवी प्रचंड वाहतूक आणि रहदारी असताना देखील रुग्णालयात वेळेवर पोहचणाऱ्या रुग्णवाहिका आता रस्ते मोकळे असूनही घटनास्थळी उशिरा का पोहचत आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारी यंत्रणा अधिक प्रभावीपणे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या कटेंनमेंट भागातील स्थिती चिंताजनक असल्याने तेथील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्याभागातील दुकाने पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. संचारबंदी आहे. केवळ अतिमहत्वाच्या सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्यविषयक सुविधा त्यातील एक आहे. मात्र गेल्या काही घटनांमध्ये रुग्णवाहिकांना झालेल्या विलंबामुळे दोघांना प्राण गमवावा लागला आहे. शुक्रवारी नाना पेठेत झालेल्या घटनेमुळे 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कोरोनामुळे शहरात सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी आहे. वाहतुकीस बंदी आहे. अशावेळी वेळेत घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचणे गरजेचे असताना त्यांना होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांना जीव गमावण्याची भीती वाटू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना घटनास्थळी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, रुग्णवाहिकेचे चालक पोलीस अधिका-यांनाच पेशंटला कुठे न्यावे? याची विचारणा करतात. कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची माहिती पोलिसांना कशी असणार? आपण ज्या रुग्णाला आणण्यासाठी चाललो आहोत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची भीती त्यांना वाटत असल्याचे दिसून आले आहे.
* कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था...
रुग्णालय व्यवस्थापन आणि रुग्णवाहिकेचे चालक यांच्यात समन्वय नाही. वाहनचालकांना कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची भीती वाटते. त्यांच्याकडे मास्क, ग्लॉव्हज आहेत. मात्र ते पुरेसे नसून त्यांना कोरोनाचा सामना करण्यासाठी एखादे प्रोफेशनल किट उपलब्ध झाल्यास त्यांची शंका दूर होईल. याशिवाय ज्या रुग्णवाहिका आहेत त्या अद्ययावत असण्याची गरज आहे. अँम्ब्युलन्स किटची गरज आहे. कर्मचाऱ्यांनाच पुरेशी सुरक्षिततेची हमी नसल्यास ते काय करणार अशी निरीक्षणे पोलीस अधिका-यांनी नोंदवली आहेत.