‘अॅमेनिटी स्पेस’ खाजगी विकसकांना भाडेकराराने देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:59+5:302021-05-29T04:09:59+5:30
पुणे : महापालिकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील अॅमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) ९९ वर्षांच्या कराराने खासगी विकसकांना भाडेकराराने देण्याच्या हालचाली सुरु ...
पुणे : महापालिकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील अॅमेनिटी स्पेस (सुविधा क्षेत्र) ९९ वर्षांच्या कराराने खासगी विकसकांना भाडेकराराने देण्याच्या हालचाली सुरु आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केवळ विकसकांचे हित जोपासण्यासाठी हा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी केला आहे. प्रशासनाने या प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवूनच पुढील पावले टाकावीत अशी मागणी केली.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाव्दारे तांबे यांनी ही मागणी केली. अॅमेनिटी स्पेस भाडेकराराने देणे हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा आणि नागरिकांना गैरसोयीचा ठरणारा आहे. पुणे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी, शहरातील सुमारे २० हेक्टर क्षेत्रावरील १२० अॅमेनिटी स्पेस खासगी विकसकांना कराराने देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यातून जे पैसे येतील, ते पुढील सहा महिन्यांतच विकासकामांच्या नावाखाली खर्च होतील. त्यामुळे हा निर्णय घाईने घेऊ नये असे तांबे यांनी म्हटले आहे.