‘आम्ही एकपात्री’तर्फे राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धा होणार - तरुणांमध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न, ‘पुलं’च्या जन्मदिनी ‘एकपात्री सम्राट’ पुरस्कारही देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:55+5:302021-04-21T04:10:55+5:30
वंदन नगरकर, बंडा जोशी, संतोष चोरडिया, उज्ज्वला कुलकर्णी आणि महेंद्र गणपुले या कलाकारांनी मिळून एकपात्री कलाकारांची एक संस्था २१ ...
वंदन नगरकर, बंडा जोशी, संतोष चोरडिया, उज्ज्वला कुलकर्णी आणि महेंद्र गणपुले या कलाकारांनी मिळून एकपात्री कलाकारांची एक संस्था २१ एप्रिल २०१२ रोजी पुण्यात स्थापन केली.
जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे, प्रसिद्ध एकपात्री कलाकार व लेखक विश्वास मेहंदळे आणि पुण्यभूषणचे डॉ. सतीश देसाई या मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचा जन्म झाला. याअंतर्गत माझ्या वडिलांचा ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम मी करत होतो. आज माझे एक हजारपेक्षाही जास्त कार्यक्रम झाले आहेत.
प्रत्येक महिन्याला सर्वांची एक मीटिंग घेऊन चर्चा करणे, विचारांचे, अनुभवाचे आदानप्रदान करणे, रंगमंचावर कार्यक्रम करणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना एकत्र करून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविणे, नवीन एकपात्री कलाकार घडवणे तसेच त्यांना व्यावसायिक कार्यक्रम करण्यासाठी मार्गदर्शन करणे, अशा प्रकारे संस्थेचे काम सुरू झाले. तसेच संस्थेचे मुंबई, सांगली, सातारा, नाशिक, नारायणगाव, चाळीसगाव येथेही आमचे सभासद आहेत. यामुळे आम्ही एकपात्री, पुणेऐवजी आम्ही एकपात्री, महाराष्ट्र असे संस्थेचे नामकरण करण्यात आले.
----------
‘पुलं’च्या साहित्यावर कार्यक्रम
दरवर्षी आम्ही ‘पुलं’च्या वाढदिवशी (८ नोव्हें) एकपात्री दिन साजरा करतो. आम्ही सर्व कलाकार मिळून ‘पुलं’च्या साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करतो.
२०१९ साली ग्लोबल ‘पुलोत्सवा’अंतर्गत संस्थेचे काही कलाकार सलालाह, ओमान येथे सादरीकरण करण्यासाठी गेले होते. तेथील काही कलाकारांनी सभासद होण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या मस्कत मधील तीन जण संस्थेचे सभासद आहेत. अशा प्रकारे संस्थेचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला आहे, अशी माहिती नगरकर यांनी दिली.