बिटकॉइन फसवणूक प्रकरणी अमित भारद्वाज व साथीदाराला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:43 PM2018-04-05T17:43:04+5:302018-04-05T21:44:06+5:30
आभासी चलन बिटकॉइनसाठी देशातील सुमारे ८ हजार जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे,
पुणे : आभासी चलन बिटकॉइनसाठी देशातील सुमारे ८ हजार जणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित महेंद्रकुमार भारद्वाज आणि विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज यांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जे.टी. उत्पात यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. या प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस आणखी ६ आरोपींचा शोध घेत आहे. हा प्रकार जुन २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान घडला. भारतात नोटा बंदी झाल्याचा या दोघांनी फायदा उठविला आहे़. नोटाबंदीच्या काळात त्यांनी एम कॅप नावाची नवीन क्रिप्टो करंस अमित भारद्वाज यांनीच निर्माण केली आहे़.सुरुवातीला एम कॅप फेज १ ही नवीन क्रिप्टोकरंसी २७ एप्रिल २०१६ मध्ये सुरु केली होती़. त्यानंतर एम कॅप फेज २ ही कंपनी जानेवारी २०१७ मध्ये स्थापन केली़. त्यात कमीतकमी १०० डॉलर गुंतविल्यास ४ महिन्यांनी २०० टक्के परवाता देण्याचे आमिष दाखविले होते़. त्यात त्यांनी रोख स्वरुपात पैसे स्वीकारणार असल्याचे सांगितले होते़. नोटाबंदीच्या काळात त्यांनी हे केले असल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले़. यावेळी सहआयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे उपस्थित होते़.
शुक्ला म्हणाल्या, अमित व विवेककुमार भारद्वाज हे दोघे मुख्य सुत्रधार असून याचा सर्वाधिक लाभ ७ जणांना मिळाला आहे़. त्यांना ७ स्टार म्हणून ओळखले जाते़. त्यात त्यांचे वडिल महेंद्रकुमार भारद्वाज, अमित भारद्वाज, विवेककुमार भारद्वाज, अजय भारद्वाज (सध्या रा़ दुबई), आशिषकुमार दवास, मनु शर्मा, रुपेश सिंग यांचा त्यात समावेश आहे़ .
भारद्वाज बंधु हे दोघे १० दिवसांपूर्वी दिल्लीला येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती़. त्यानुसार आमची टीम तेथे गेली होती़. पण, ही माहिती लिक झाल्याने ते आले नाही़. गुरुवारी ते येणार असल्याची माहिती मिळाली होती़. आमची टीम तेथेच होती़. त्यांनी दिल्ली विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेतले़. दुपारी त्यांना पुण्यात आणल्यानंतर अटक करण्यात आली़. न्यायालयात दोघांनाही हजर केल्यावर अधिक तपासासाठी १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़. या प्रकरणातील आणखी काही आरोपी वॉटेंड असून त्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले़. या प्रकरणातील दोन्ही आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात आहे. विशेष सरकार वकील सुनील हांडे यांनी कंपनी सिंगापूरची आहे, आरोपींनी काही माहिती डिलीट केल्याचे समजते. त्यामुळे सर्व माहिती आणि लॉंग इन व पासवर्ड घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली.बिटकॉईन फसवणूक प्रकरणात आतापर्यंत देशभरात तीन गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्हे निगडी व दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.