Amit Shah in Pune: केंद्रीय गृहमंत्री दोन दिवस पुणे दाैऱ्यावर; कसा असेल दौरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:55 PM2023-02-18T12:55:37+5:302023-02-18T12:58:11+5:30
त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत...
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांसाठी पुणे मुक्कामी येत आहे. शनिवारी दुपारी ते पुण्यात येतील. शनिवारच्या तब्बल पाच कार्यक्रमांनंतर रविवारीही ते शिवसृष्टीचा लोकार्पण कार्यक्रम करतील. त्यानंतर ते पुण्यातून विमानाने कोल्हापूरला रवाना होतील. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत.
प्रोटोकॉल चुकू नये याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या सहायकांना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त या दौऱ्याकडे खास जातीने लक्ष देत आहेत. शाह शनिवारी सायंकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘मोदी ॲट २०’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करणार आहेत.
पंडित फार्मस, डी. पी. रोज इथे हा कार्यक्रम होईल. त्यानंतर ते शिवरात्रीचे औचित्य साधून ओंकारेश्वराचे दर्शन घेणार आहेत. रात्री ते खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करतील. त्यानंतर सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता शाह यांच्या हस्ते आंबेगाव येथील शिवसृष्टीचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते कोल्हापूरला रवाना होतील.