मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचेच नाव ‘मातोश्री’वर बैठकीत ठरले होते; अमित शहांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:05 AM2021-12-20T05:05:41+5:302021-12-20T05:07:20+5:30
सत्ता सोडून पुन्हा निवडणुका लढण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ‘माताेश्री’वर ठरले होते. तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. भाजपशी विश्वासघात केला आणि ज्यांच्याशी लढायचे, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी पुण्यात केला. असा खुलासा शहा यांनी दोन वर्षांनी केला आहे. हिंमत असल्यास राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा, असे खुले आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.
२५ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘अटल शक्ती महासंपर्क अभियाना’ची घोषणा यावेळी करण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. माझ्या कारकिर्दीची सुरुवात बुथ अध्यक्ष म्हणून झाली. बुथचा अध्यक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच घडू शकते. पक्षात जो मागत नाही, त्याला न मागताच सगळे काही मिळते. हा नेत्यांचा
नव्हे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि तेच पक्षाचे भविष्य आहे. कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो, असेही ते म्हणाले.
राज्य सरकारने पेट्रोलऐवजी दारू स्वस्त केली!
- महाआघाडी सरकार कायम महागाईच्या नावाने आरडाओरड करते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल स्वस्त करा, असे सांगितले. मात्र, या सरकारने चुकीचे ऐकले आणि दारू स्वस्त केली. नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारायला हवेत. सिद्धांतरहित राजकारण कोणालाही आवडत नाही.
- राजकारणाचे अपराधीकरण आणि वसुलीचे शासन हेच शिवसेनेचे ध्येय आहे, अशी टीका शहा यांनी केली.
‘विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी’
- आपल्याला विश्वासघाताचे परिमार्जन करायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. जुने वैभव परत मिळवायचे आहे.
- वैभव परत मिळविण्याची संधी पुणेकरांच्या हातात आहे. विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली.