अमित शाह यांच्या पुणे भेटीचा आमदारांना धसका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 08:13 PM2018-06-16T20:13:39+5:302018-06-16T20:13:39+5:30

शाह यांनी आमदारांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली तर काय करायचे याचा धसका ‘ त्या तीन ’ आमदारांसह अन्य आमदारांनीही घेतला आहे.

Amit Shah's visit to Pune MLA in under tension | अमित शाह यांच्या पुणे भेटीचा आमदारांना धसका 

अमित शाह यांच्या पुणे भेटीचा आमदारांना धसका 

Next
ठळक मुद्देसंघटना व लोकप्रतिनिधी, त्यातही प्रामुख्याने महापालिकेतील लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दरी

पुणे: देशातील विविध राज्यात भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून देणारे भाजपाचे बहुचर्चित राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ८ जुलैला पुण्यात येत आहेत. भाजपाच्या आवडत्या चाणक्य या विषयावर ते पुण्यात बोलणार असून त्याशिवाय त्यांचे आणखी काही कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपाच्या पुण्यातील आमदारांना त्याचा धसका बसला आहे, तर संघटनेतील पदाधिकारी त्यांनी कोणाला भेटायची इच्छा व्यक्त केली तर कोणती नावे सुचवायची या विचारात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखाल भाजपात शाह यांचे वजन आहे. संघटनेवर त्यांनी मोठी पकड बसवली आहे. त्यामुळे राज्यातील बहुसंख्य पदाधिकारी त्यांना दबकून असतात. त्याशिवाय लोकप्रतिनिधींवरही त्यांचा वचक आहे. मतदारसंघ बांधून ठेवण्याचे शाह यांचे कौशल्य प्रत्येक निवडणूकीत वादातीत ठरले असून त्यातूनच त्यांनी एक फार्म्युला तयार केला आहे. बूथ कमिटयांची जबाबदारी संघटनेवर व मतदारांना बांधून ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीवर असे त्यांचे सुत्र आहे. त्यात कमीजास्त झालेले त्यांना चालत नाही. तसे करणाऱ्याला सर्वांसमोरच सुनावण्याची त्यांची पद्धत आहे. त्याचाच धसका पुण्यातील आठही आमदारांनी घेतला असून संघटनेचे पदाधिकारीही त्यांनी ऐनवेळी काही विचारणा केली तर काय सांगायचे या चिंतेत आहेत.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यक्रमासाठी म्हणून शाह ८ जुलैला पुणे भेटीवर येत आहेत. गणेश कला क्रिडा मंच येथे सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचे आर्य चाणक्य या विषयाव व्याख्यान होणार आहे. त्यादिवशी सकाळीच ते पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. पक्षीय कार्यक्रम करायचे किंवा नाहीत हे अद्याप नक्की झालेले नाही, मात्र किमान संपर्क से समर्थन या त्यांच्या खास मोहिमेतंर्गत ते पुण्यातील काही महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेण्याची इच्छा व्यक्त करतील असा पक्षाच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा कयास आहे. त्यादृष्टीने नावे निश्चित करण्यात येत आहेत. ती शाह यांना कळवून त्यांची संमती घेण्यात येईल.
पुण्यातील आमदारांच्या कामाचे मध्यंतरी पक्षाच्या वतीने एका खासगी संस्थेच्या साह्याने मतदारसंघात फिरून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात तीन आमदारांचा जनसंपर्क कमी असल्याचा निष्कर्ष निघाला होता. त्याचवेळी त्यांनी सूचना देत यात बदल करण्यास सांगण्यात आले होते. पुणे शहराच्या आठही मतदारसंघात भाजपाचेच आमदार आहेत. शाह यांना त्याची पूर्ण माहिती आहे. या जागा कायम राहिल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. दिवसभरात वेळ असला व शाह यांनी आमदारांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली तर काय करायचे याचा धसका या तीन आमदारांसह अन्य आमदारांनाही घेतला आहे. कामाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात आले आहे.
संघटना व लोकप्रतिनिधी, त्यातही प्रामुख्याने महापालिकेतील लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दरी पडली आहे. वाहनतळ धोरणासारख्या विषयावर तर ही दरी उघड झाली होती. संघटनेतील लोकांना महापालिकेतील वावर वाढला असल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर संघटनेच्या बळावरच पक्षाला महापालिका निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळाले असून ते टिकवण्यासाठी काहीवेळा ठोस भुमिका घेणे ही संघटनेचे कर्तव्यच आहे, असे संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही दरी शाह यांच्यासमोर उघड होऊ नये यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहे.             

Web Title: Amit Shah's visit to Pune MLA in under tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.