फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो बघा - अमिताभ गुप्ता
By नम्रता फडणीस | Published: July 18, 2024 06:05 PM2024-07-18T18:05:43+5:302024-07-18T18:07:01+5:30
पोलीस आयुक्त असताना गुन्हेगारांना पकडून कारागृहात टाकले आणि त्यानंतर कारागृह महानिरीक्षक झाल्यावर कैद्यांच्या समस्याच सोडविण्याचे काम केले
पुणे : कैद्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांवर अनेक जण फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा देण्यात येत असल्याची टीका करत आहेत. पण मला काहीच फरक पडत नाही. एकदा फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एकट्याला ठेवून मोबाईल काढून घेतल्यास काय त्रास होतो हे बघा. मग फाईव्ह स्टार हॉटेल आणि कारागृह यातील फरक समजेल अशा शब्दांत मावळते अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी टीकाकारांना सुनावले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी (दि. १८) अमिताभ गुप्ता यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. पुण्यातून पोलीस आयुक्त ते कारागृह महानिरीक्षक असा प्रवास गुप्ता यांनी उलगडला. पोलीस आयुक्त असताना गुन्हेगारांना पकडून कारागृहात टाकले आणि त्यानंतर कारागृह महानिरीक्षक झाल्यावर कैद्यांच्या समस्याच सोडविण्याचे काम केले. आयुक्तांचा रोल नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा होता आणि कारागृह महानिरीक्षक झाल्यानंतर कैद्यांना सगळं काही मिळत आहे की नाही हे पाहण्याचे काम केले, अशी डबल ड्युटी निभावली असल्याची मिश्किल टिप्पणी अमिताभ गुप्ता यांनी केली.
ते म्हणाले, कारागृह महानिरीक्षक म्हणून मला भरपूर शिकायला मिळाले. ज्या काही गोष्टीबाबत कारागृहावर टीका झाली. त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना केल्या.. मानवी अधिकाराच्या अनुषंगाने कैद्यांना जे काही देता येत होते ते त्यांना दिले आहे. कारागृहातील अनेक चुकीच्या गोष्टी बदलल्या. अनेक कारागृहात मोबाईल सापडत होते. त्यासाठी राज्यातील ३० कारागृहात फोनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी थांबल्या आहेत. यानंतर अनेक कारागृहात सीसीटीव्ही बसविल्याने सुरक्षितता आणि पारदर्शकता आली. कैद्यांच्या लहान लहान मागण्या होत्या. गाडी, स्वेटर, गरम पाणी, वॉटर कुलर, वाशिंग मशीन या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. कारागृहात भजन स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा घेतल्या. पूर्ण समर्पण भावनेतून काम केले. ज्याच्या कामाचे त्याला श्रेय दिले. कैद्यांचा दृष्टीकोन बदलला. नवीन कारागृहासाठी पालघर, नगर, येरवडा येथील कामाला गती मिळाली. पुणे पोलिस आयुक्त पद सोडल्यानंतर मानसिकरित्या स्थिरस्थावर व्हायला जवळपास एक महिना लागला. निवृत्ती नंतर पुण्यातच वास्तव्यास राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. .
सोशल मीडियाचा कामात सकारात्मक वापर
पुण्यात काम करत असतांना सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. सोशल मीडियाबरोबरच इतर माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे त्यांना नेमके काय हवे, त्यांची मागणी काय आहे समजले आणि त्या अनुषंगाने काम केले. गुगलचा वापर करून तीन ते चार भाषेमध्ये प्रेस नोट काढल्या. यामुळे मराठी, हिंदी बरोबर इतर भाषिक माध्यमांनी दखल घेतली असल्याचे गुप्ता म्हणाले.
कारागृह नियमावली ब्रिटिश काळातील आहे. ते नियम बदल्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीसाठी समिती स्थापन केली जाते. काळानुसार या बदल करायला हवा. खुल्या कारागृहाबाबद्दल स्पष्टता गरजेची आहे. एक जण काही तरी चुकीचे करतो त्याच्या परिणाम अनेकांना भोगावा लागतो. यात बदल करावा लागणार आहे. ८० टक्के कैद्यांकडून पहिल्यांदा गुन्हा होतो. त्या दिवशी त्यांच्याकडून चूक होते. त्यांना चांगला वकील मिळत नसल्याने त्यांना अनेक दिवस कारागृहात राहावं लागत असल्याकडेही गुप्ता यांनी लक्ष वेधले.