क्रिकेट विश्वात भूकंप घडविणारे अमितेश कुमार पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 07:28 PM2024-01-31T19:28:55+5:302024-01-31T19:29:46+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच दाऊद इब्राहिमच्या हस्तकामध्ये होणारी बातचीत टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.
किरण शिंदे
पुणे - शहराच्या नवीन पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी ते नागपूरचे पोलीस आयुक्त होते. १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले अमितेशकुमार सप्टेंबर 2020 पासून नागपूरचे पोलीस आयुक्त होते. त्यापूर्वीही २० ऑक्टोबर २००५ ते ६ जुलै २००७ असे दोन वर्षे नागपूरला पोलिस उपायुक्त म्हणून ते कार्यरत होते. नागपुरात कार्यरत असताना त्यांनी डी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगचा भंडाफोड केला होता. बिहारमधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सेवा दिली.
अमितेश कुमार यांची कारकीर्द तशी चर्चेत आहे..अमितेश कुमार यांनी २००५ ते २००७ या कालावधीत नागपूर येथे कार्यरत असताना त्यांनी क्रिकेट विश्वात भूकंप घडवला होता..तेव्हा नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची चमू हॉटेल प्राईड मध्ये मुक्कामी थांबली होती. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच दाऊद इब्राहिमच्या हस्तकामध्ये होणारी बातचीत टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.
अष्टपैलू खेळाडू मरलोन सॅम्युअल यांच्यासाठी हॉटेल प्राइडच्या लॅंडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलिस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर नजर रोखली. त्यांच्या समयसुचकतेमुळे जगभरातील क्रिकेट रसिकांना मोठा धक्का देणारी खळबळजनक बाब त्यावेळी उघड झाली. अंडरवर्ल्ड डॉन तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा क्रिकेट बॅटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा राईटहॅण्ड मुकेश कोचर हा दुबईतुन मॅच फिक्सिंग साठी वारंवार मरलोन सोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. नंतर देश-विदेशातील तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष वेधले होते. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मार्लोन सॅम्युअल्स याच्यावर दोन वर्षाची बंदीही घातली होती."