कोरेगाव भीमाच्या सरपंचपदी अमोल गव्हाणे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:06+5:302021-02-26T04:14:06+5:30
कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावर तालुक्याच्या राजकारणात अग्रगण्य असलेल्या कोरेगाव भीमा (ता. शिरुर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता ...
कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावर तालुक्याच्या राजकारणात अग्रगण्य असलेल्या कोरेगाव भीमा (ता. शिरुर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच अपेक्षेप्रमाणे जय मल्हार पॅनेलचे अमोल शहाजी गव्हाणे व उपसरपंचपदी शिल्पा गणेश फडतरे यांची बिनविरोध निवड झाली.
शिरुर तालुक्याच्या राजकारणात व औद्योगिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोरेगाव भीमाच्या राजकारणात गेली काही वर्षांपासून अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असल्याने सरपंच व उपसरपंच पदासाठी शेवटपर्यंत कोण होईल याची उत्सुकता कायम असते. सतरा सदस्यसंख्या असलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीवर जय मल्हार पॅनेलला ११, तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला ६ जागा मिळाल्या होत्या. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी अमोल गव्हाणे, संदिप ढेरंगे , महेश ढेरंगे , विक्रम ढेरंगे यांनी तर उपसरपंच पदासाठी शिल्पा फडतरे व जयश्री गव्हाणे यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या वेळी संदिप ढेरंगे , महेश ढेरंगे , विक्रम गव्हाणे व जयश्री गव्हाणे यांनी अर्ज माघार घेतल्याने सरपंचपदी अमोल गव्हाणे व उपसरपंचपदी शिल्पा फडतरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एल. एन. जंजीरे यांनी सांगितले.
या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गुलाबराव नवले यांनी काम पाहिले, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपनिरिक्षक राजेश माळी व सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी जय मल्हार पॅनेलचे विठ्ठलराव ढेरंगे, कैलासराव सोनवणे, बाळासाहेब फडतरे, अशोक गव्हाणे , अनिल काशिद , विक्रम दौंडकर , नारायण फडतरे आदींसह नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंचांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच अमोल गव्हाणे व उपसरपंच शिल्पा फडतरे यांनी कोरेगाव भीमाच्या प्रलंबित शुध्द पाणी प्रकल्प व प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय मार्गी लावण्याबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
२५ कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडून आलेले सरपंच अमोल गव्हाणे व उपसरपंच शिल्पा फडतरे व इतर सदस्य.