अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये कवडीमोल विकासकामे केलेली आहेत; प्रवीण दरेकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:35 IST2024-05-09T14:34:50+5:302024-05-09T14:35:15+5:30
निवडणुकीत जनता खासदार अमोल कोल्हेंना कवडीमोल करणार

अमोल कोल्हेंनी शिरूरमध्ये कवडीमोल विकासकामे केलेली आहेत; प्रवीण दरेकरांची टीका
न्हावरे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे व गोरगरीब जनतेला दिलेला मदतीचा हात पाहता जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल. निवडणुकीत जनता खासदार कोल्हेंना कवडीमोल करणार, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
न्हावरे (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रवीण दरेकर बोलत होते. पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात कवडीमोल विकासकामे केलेली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनता खासदार कोल्हेंना कवडीमोल करणार आहे. घोडगंगा कारखाना बंद पडला आहे त्याची किंमत आमदार अशोक पवारांना चुकवावी लागणार आहे. मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून कामकाज करत असल्यामुळे सहकाराचा आपल्याला अनुभव आहे. आपण महायुतीच्या उमेदवारास साथ द्या. आम्ही मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून घोडगंगा कारखान्यास अर्थसाहाय्य करून हा कारखाना पुढील हंगामात सुरू करू, असेही यावेळी प्रवीण दरेकर यांनी सांगितले. देशात भाजप महायुतीप्रणित नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे तेव्हा मतदारसंघाच्या विकासासाठी मला साथ द्या, असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी, बेरड समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांनी समाजाला सन्मानाची वागणूक दिलेली आहे त्यामुळे रामोशी, बेरड समाज महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी सांगितले.