अमोल मिटकरींना 'ते' विधान चांगलंच भोवण्याची शक्यता? पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:20 PM2022-04-22T17:20:36+5:302022-04-22T17:20:42+5:30
ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मामधील ‘कन्यादान’ या पवित्र लग्नविधीबाबत विधान करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे
पुणे : ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्मामधील ‘कन्यादान’ या पवित्र लग्नविधीबाबत विधान करणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानामुळे हिंदू धर्मियांसह ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिटकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार भारतीय
जनता युवा मंचचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेला इस्लामपूरमध्ये सुरूवात झाली. त्यावेळी झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी 'आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, पण एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती.त्यावेळी ब्राह्मणाने ’’ मम भार्या समर्पयामी’ असा एक मंत्र म्हटला. मी नवरदेवाच्या कानात त्याचा अर्थ सांगितला, अरे येड्या ते महाराज म्हणतायत ‘मम म्हणजे माझी. भार्या म्हणजे माझी बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा..आरारारा कधी सुधारणार? अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान ब्राह्मण समाजाबाबत केले होते. सध्या याच त्यांच्या विधानावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे.
ब्राह्मण महासंघानेही मिटकरी यांच्या विधानाचा निषेध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात आंदोलन केले होते. मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची बदनामी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यात आता भारतीय जनता युवा मंचचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी मिटकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मिटकरी यांच्या या विधानामुळे हिंदू धर्मातील बांधवांच्या व खास करून ब्राहमण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. ब्राहमण समाजातील मोठा घटक हा पौराहित्य वर आपली उपजीविका चालवतो. हे विधान मिटकरी यांनी मुददाम केले असून, ब्राह्मण समाजाची खिल्ली उडविण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.