उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे : अमोल मिटकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 02:15 PM2022-12-12T14:15:41+5:302022-12-12T14:27:04+5:30
सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे....
दौंड (पुणे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील तीन तर भाजपचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या दिवशी शिंदे- फडणवीस यांचे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या परिस्थितीत शिंदेगट आणि भाजप या दोन्ही गटातील काही आमदारांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शिंदे गटातील काही आमदारांना विश्वास आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून येऊ शकतो, त्यानुसार शिंदे गटाचे तीन आमदार येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले असतील . त्या पाठोपाठ भाजपचे काही आमदार या दोन्ही गटातील आमदारांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच हा राजकीय भूकंप होणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही वाचाळविरांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा सपाटा लावला आहे, तेव्हा महाराष्ट्रात वाचाळविचारांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. परिणामी, खुद्द भाजप आणि शिंदे गटाच्या काही मंत्री आणि आमदारांनीदेखील राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या वाचाळांबाबत संताप व्यक्त केलेला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अन्याय करीत आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस सरकार या प्रश्नावर गप्प आहे, ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे, असंही मिटकरी म्हणाले.
राज्यपाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील आहे. परिणामी, राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राज्यपालांपुढे नमते घ्यावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून काम करण्याची इच्छा नाही. दरम्यान, काहीतरी वादग्रस्त विधान केले तर आपली महाराष्ट्रातून हकालपट्टी होईल, म्हणून राज्यपालांनी वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचे शेवटी मिटकरी म्हणाले.
उदयनराजे यांनी राजीनामा द्यावा
शिवरायांचे वारसदार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधानांना राज्यपालांच्या तक्रारीचे पत्र पाठवले. वास्तविक पाहता शिवरायांचा वेळोवेळी होत असलेला अपमान पाहता उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी भाजपपुढे नमते घेतल्याची वस्तुस्थिती असल्याचे शेवटी अमोल मिटकरी म्हणाले.