पश्चिम भागातील वाहतूककोंडीवर कालव्याच्या जागेची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:39+5:302021-05-29T04:10:39+5:30
पुणे : पुण्याच्या पश्चिम भागाचा विकास झपाट्याने होत असून, या भागातील कोंढवे धावडे, उत्तमनगर आणि शिवणे परिसरात मोठ्या ...
पुणे : पुण्याच्या पश्चिम भागाचा विकास झपाट्याने होत असून, या भागातील कोंढवे धावडे, उत्तमनगर आणि शिवणे परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीवर ताण आला आहे. ही वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आता कालव्याची जागा मिळणार आहे. तब्बल सात किलोमीटरची जागा पालिकेला भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला असून, त्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाला याबाबतच सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुण्याचा कक्षा विस्तारत असतानाच विविध उपनगरे आणि समाविष्ट गावे विकसित होत आहेत. या भागात लोकसंख्या वाढत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच खडकवासला धरणाच्या जवळ असलेल्या पश्चिम पुण्याचा विकासही झपाट्याने होऊ लागला आहे. पालिकेने यापूर्वी या डाव्या कालव्याच्या जागेचा रस्त्यासाठी वापर केलेला आहे. पालिकेने २० किलोमीटर जागेवर रस्ता बांधला असून त्यापोटी पालिका जलसंपदाला भाडे अदा करते. आता शिवणे भागातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी सात किलोमीटरची जागा महापालिकेला भाडेतत्त्वावर मिळणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याबाबत पाठपुरावा केला होता. पालिका प्रशासनाने यासंदर्भातील करारनामा करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचाही सूचना केल्या आहेत.
----
खडकवासला पाटबंधारे विभागाकडे कालव्याची जागा देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. खासदार सुुप्रिया सुळे यांनी ही मागणी केलेली होती. शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर जागा घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग
-----
कोंढवे धावडे-शिवण्याला शहराला जोडण्यासाठी सध्या एकच रस्ता आहे. या भागातील लोकसंख्या वाढली असून पर्यायी रस्ता आवश्यक आहे. नवीन रस्त्याचे नियोजन करण्यात आले असून पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तीन कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.
- सचिन दोडके, नगरसेवक
-----
डावा कालवा हा कोंडवे- धावडे, एनडीए गेट, पौड रस्ता, कर्वे रस्ता, कोथरुड, शिवाजीनगर मार्गे कृषी महाविद्यालयापासून जातो. हा कालवा अनेक वर्षांपासून बंद आहे. या कालव्याची जागा रस्ता म्हणून विकसित करण्यात आली आहे. शहरातील पुणेकर आजही या रस्त्याला कॅनॉल रस्ता नावाने संबोधतात. पालिकेने पौड रस्ता आणि कर्वे रस्ता यांना जोडण्यासाठी या रस्त्याचा वापर केला आहे.