कचरा समस्येवर ‘मोबाईल कचरा प्रकल्पा’ची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:15+5:302020-12-14T04:27:15+5:30
पुणे : शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया न होता शिल्लक राहिलेल्या कचऱ्यावर आता मोबाईल कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया ...
पुणे : शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया न होता शिल्लक राहिलेल्या कचऱ्यावर आता मोबाईल कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे. रामटेकडी, हडपसर, कात्रजसह चार कचरा रॅम्पवर हे प्रकल्प उभारले जाणार असून या प्रकल्पाची क्षमता १०० ते २०० मेट्रिक टनांची ची असणार आहे. रामटेकडीत साठवून राहिलेल्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिली.
शहरात दिवसाला साधारणपणे २१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. स्वच्छ सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमार्फत हा कचरा गोळा केला जातो. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. शहरातील काही कचरा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठून राहिलेला आहे. आजमितीस मोठ्या प्रमाणावर कचरा प्रक्रिया न होता शिल्लक राहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने तसेच काही प्रकल्प बंद असल्याने शहरात कचरा समस्या उद्भवली आहे. नुकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जात नसल्यामुळे ८० लाख रुपयांचा दंड केला आहे. महापालिकेने अद्याप हा दंड भरलेला नसून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला उत्तर देण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. आम्ही शहरातून उचललेला कचरा अन्यत्र टाकत नसून कचरा डेपो वरच एकत्र करून ठेवला असला असल्याचे तसेच या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे धिकार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला दंड मान्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रक्रिया न होता पडून राहिलेला कचरा आता या मोबाईल कचरा प्रकल्पांच्या माध्यमातून निर्मूलन करण्यात येणार आहे.
मोबाईल कचरा प्रकल्प म्हणजे ?
रामटेकडी येथील कचरा प्रकल्पावर साठवून ठेवण्यात आलेल्या कचर्याचे निर्मूलन मोबाईल कचरा प्रकल्पांच्या मार्फत केले जाणार आहे. त्यासाठी छोटे-छोटे प्लांट उभारले जाणार असून या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. याला मोबाईल कचरा प्रकल्प म्हटले जाते. कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठविला जाणार असून कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या लीचडच्या माध्यमातून लँडफिलिंगचेही काम केले जाणार आहे.