कोरोनावर ‘प्राणायामा’ची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:34+5:302021-05-09T04:10:34+5:30
पुणे : सध्या कोरोनामुळे थेट फुफ्फुसावरच परिणाम होत असून, श्वास घेण्यास त्रास होत आहे. म्हणून ऑक्सिजनची गरज भासत आहे. ...
पुणे : सध्या कोरोनामुळे थेट फुफ्फुसावरच परिणाम होत असून, श्वास घेण्यास त्रास होत आहे. म्हणून ऑक्सिजनची गरज भासत आहे. पण, जर नियमित प्राणायाम केला, तर फुफ्फुसांना ऑक्सिजन कमी पडणार नाही आणि तुमचे फुफ्फुसे बळकट होतील. आता अनेक जणांना प्राणायामचे फायदे समजले असून, ते याकडे वळत आहेत. डॉक्टर देखील प्राणायाम करण्याचे सल्ले देत आहेत.
प्राणायामाचे अनेक प्रकार व लाभ आहेत. सध्या कोरोनामध्ये श्वसन संस्थेवर परिणाम होऊन अनेकजण कोरोनाग्रस्त होत आहेत. फुफ्फुसांवर विषाणू हल्ला करून त्यांची ताकद कमी करत आहे. म्हणून सर्दी-खोकला होऊन प्रतिकारशक्ती कमी पडते. जर प्राणायाम केला तर फुफ्फुसांची शक्ती वाढते आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळतो.
================
प्राणायाम नियमित केल्यास होणारे फायदे -
आत्मिक आनंद मिळतो, स्मरणशक्ती वाढते, मनःशांती लाभते, दीर्घआयुष्य प्राप्त होते, आत्मिक साक्षात्कार होते, शरीर सुदृढ व निरोगी राहाते, प्राणयामामुळे अकारण वाढलेली चरबी किंवा मेद घटतो, मन शांत व स्थिर बनते,
प्राणायामामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होतात, जठराग्नि प्रदीप्त होतो, मनाची एकाग्रता वाढते, शरीराची सुस्ती जाते, नियमित प्राणायाम केल्यामुळे पोट, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे यांची कार्यक्षमता वाढते आणि पचनक्रिया सुधारते. माणसाला तग धरून रहाण्यासाठी आधुनिक प्रदूषणयुक्त जगात वावरताना प्राणायाम करणे गरजेचे आहे.
========================
प्राणायाम म्हणजे शारीरिक व मानसिक स्थैर्य यावे यासाठी केला जाणारा व्यायाम आहे. हा श्वसनाचा व्यायाम. प्राणायाम ही श्वासावर नियंत्रण ठेवणारी एक कला आहे. श्वास घेण्याच्या विविध पद्धती म्हणजे प्राणायाम. उदा- कपालभाती, भ्रामरी, अनुलोम- विलोम, उज्जयी, शितली हे प्राणायामाचे काही प्रकार सांगता येतील. प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. एवढेच नाही तर आपले फुफ्फुस निरोगी होतात व शरीरातील ऑक्सिजनपातळी समतोल राहते. नाक व घशात असलेले अडथळे (घसा खवखवणे, कानाला दडे बसणे इत्यादी) दूर होण्यास मदत होते. 'शितली' प्राणायाम नियमित केल्याने ताप व पित्तविकार कमी होण्यास मदत होते.
- पूजा यादव, योग प्रशिक्षक
-------------------
दररोजच्या ताण-तणावात जगत असताना अनेकदा निराश वाटू शकते .विविध चिंताचे मळभ मनावर येऊ शकते, मलाही असे अनुभव बऱ्याचवेळा आले आहेत. गेली काही वर्षे मी नियमितपणे प्राणायाम करते त्यामुळे मनाची एक वेगळीच प्रसन्नता अनुभवता येते. शिवाय, त्यामुळे माझी दैनंदिन कार्यक्षमता वाढली आहे. प्राणधारणा, अनुलोम-विलोम, भ्रामरी, उज्जयी याचा मला फार उपयोग झाला. आयुष्यात सकारात्मकता येण्यास मदत होते.
- शुभदा कासले, योग साधक
================
प्राणायामामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक श्वासावाटे बाहेर टाकले जातात. परंतु, केवळ शरीराची शुध्दी नसून मनातील नकारात्मक विचार, ताण, चिंता देखील हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव नियमित प्राणायाम केल्याने मी घेत आहे. प्राणायामामुळे शरीरात अत्यंत सूक्ष्म पातळीवर नकळत चांगले मानसिक बदल घडून येतात, त्याचा फायदा शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ टिकवून ठेवण्यात होतो,असा माझा अनुभव आहे.
- भाग्यश्री चौथाई, योग साधक
===============
प्राणायामामुळे डायफ्रामॅटिक हालचाल होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पांढऱ्या पेशींच्या हालचाली वाढण्यास मदत होते. प्राणायाम केल्याने पचनशक्ती सुधारते. फुफ्फुसे मजबूत होतात. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य चांगले राहते. प्राणायामामुळे नाक मार्ग स्वच्छ होऊन चोंदलेले नाक साफ होण्यास मदत होते. ताण-तणाव दूर होतो.
- सुषमा वाकडे, योग प्रशिक्षक