शालेय पोषण आहाराची रक्कम बँकेत जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:54+5:302021-06-27T04:08:54+5:30
पुणे : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या काळात दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खर्चाच्या रक्कमे इतके आर्थिक साहाय्य थेट ...
पुणे : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या काळात दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खर्चाच्या रक्कमे इतके आर्थिक साहाय्य थेट लाभार्थी विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील तब्बल १ कोटी ५ लाख विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढावे लागणार आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये देशातील तब्बल ८० कोटी लाभार्थ्यांना दरमहा पाच किलो प्रति लाभार्थी अन्नधान्याचे वाटप केले जाते. मोफत धान्य तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक विशेष कल्याणकारी उपाय म्हणून डीबीटी द्वारे बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार लिंक बँक खाते अद्ययावत करून तयार ठेवावे, तसेच ज्या विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्यात आले नाही, त्यांचे खाते उघडण्याबाबत शाळांनी पालकांना सहकार्य करावे, असे परिपत्रक राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी काढले आहे.
---------------------------------
सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याच्या खात्यात अंदाजे १५० ते २०० रुपये जमा होणार आहेत. पालकांनी घरा जवळील बँकेत झिरो बॅलेन्सने विद्यार्थ्याचे बँक खाते उघडावे.
- दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य
------------